पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/१६०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तो शेतकऱ्यांच्या भल्यासाठी केवळ केला नाही तर दारिद्र्याचा प्रश्न हटवण्याच्या दृष्टीने केला. त्यातून शोषणाची कल्पना आली. आज दारिद्र्य ज्या शोषणातून येते मी अंतर्विरोधाची रेषा इंडिया आणि भारतामध्ये आहे. पण याचा अर्थ दुसऱ्या तशाच रेषा अस्तित्त्वात नाहीत असा नाही. इंडियात जसे वेगवेगळे भेद आहेत, तसेच ते भारतातही आहेत; परंतु त्याच्यातील एकेका भेदाचा काळ यायचा आहे आणि त्या काळी, त्या रेषेवर केलेला लढा परिणामकारक ठरेल. शेतकरी-शेतमजूर हा वेगळा गट करणे, तशी कल्पना करणे चूक आहे. त्या विषयावर मी नंतर येतो, कारण आज 'भारतातल्या' लोकांचा समान बिंदू कोणता आहे. त्याचा विचार प्राधान्य मिळवणार. विरोधाचे बिंदू पुष्कळ आहेत. गाव, जाती यात भांडणे आहेत. पोळ्याच्या दिवशी कोणाचा बैल कमानीखालून पहिल्यांदा जातो यावरूनसुद्धा पिढीजात भांडणे आहेत. मग आपण जेव्हा संघटना बांधतो तेव्हा जास्तीत जास्त समान भूमिका कोणती मिळते आहे हे पाहावे आणि त्याकरिता इंडिया आणि भारत ही आजची अंतर्विरोधाची महत्त्वाची रेषा आहे. याहूनही महत्त्वाचा मुद्दा असा की हा शेतकरी-शेतमजुरांचा भेद मुद्दाम केला जातो. मी असे म्हणतो याचे कारण सांगतो. शेतकरी संघटनेचे आंदोलन तयार झाल्यानंतर डाव्या पक्षाच्या एका पुढारीणबाईंनी असे जाहीर केले की, ही चळवळ आम्हाला मान्य नाही आणि आम्ही ताबडतोब आता शेतमजूर आंदोलन चालू करणार आहोत. माझ्या काही सहकाऱ्यांना आश्चर्य वाटले की, आपण दारिद्र्याविरुद्धचा लढा म्हणून हा लढा चालू करतो आणि डावी म्हणविणारी मंडळी याच्याविरुद्ध शेतमजुरांचे आंदोलन उभे करतात ही काय भानगड आहे? कम्युनिस्ट पक्षाच्या बाई या! कोणत्या डाव्या, उजव्या की मार्क्सिस्ट हे मी सांगत नाही; परंतु सर्व कम्युनिस्ट वाङ्मयामध्ये - येथे मी मुख्य उल्लेख प्रियाबेझिन्स्की, बुखारीन आणि लेनिनच्या Agrarian Policy वरील स्टॅलिनची कॉमेंट- या सर्वामध्ये उघडपणे ही मंडळी सांगतात की शेतमजूर आणि शेतकरी यांना वेगळे पाडले पाहिजे. शेतकऱ्यांचा क्लास हा नामशेष झाला पाहिजे. जी मंडळी औद्योगिक संबंधांमध्ये सगळ्या कामगारांनो एक व्हा म्हणून घोषणा करतात, तीच मंडळी ग्रामीण भागात आल्यावर फूट कशी पडेल, एक वर्ग नामशेष कसा होईल याकडे लक्ष देतात ही चूक त्या मंडळींचीच आहे. मूळ पुस्तक लिहिणारांची आहे असे मी मानत नाही. पण अशी पोथीनिष्ठा घातक असते. मग ती भगवद्गीतेवरील असो किंवा दासकॅपिटलविषयी असो आणि

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । १६२