पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/१६८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 उत्पादन खर्च काढण्याच्या पद्धती :


 १) प्रातिनिधिक शेत घेऊन त्याचा उत्पादनखर्च काढायचा.
 २) शेतीमाल आयोगाची रँडम सँप्लिंग पद्धत.
 ३) नमुनेदार शेतीची पद्धत, जी आम्ही वापरतो.
 आम्ही काही कॅलिफोर्नियातीला शेती घेतली नाही. पण आज जी शेती आहे त्यापेक्षा पुढल्या वर्षी एक पाऊल तरी वर काढले पाहिजे. अशा तऱ्हेने शेतीच्या मागण्या घेऊन त्याचा खर्च काढायचा अशी आमची कल्पना आहे. हा प्रश्न बिकट आहे. गणित करून ते लगेच सार्वजनिकरीत्या जाहीर करून, वेगवेगळ्या जागी आंदोलने सुरू केली तर जेव्हा खरे आंदोलन सुरू होईल, तेव्हा त्याला या घिसाडघाईचा त्रास होण्याची शक्यता आहे. याही जबाबदारीची जाणीव उत्साही मंडळींनी ठेवावी.
 आणखी एक गोष्ट लक्षात घ्या.

 तेल किंवा खाणीचे जे व्यवसाय असतात, त्यामध्ये Depletion Allowance धरला जातो. (Depreciation वेगळं) की हे जे तेल काढले जातेय, ते काही पुन्हा येणार नाही. त्याची व्यवस्थाही उत्पादन खर्चात व्हायला हवी. पुण्यात हडपसर ते उरुळीकांचन या भागात खूप मोठे ऊस बागायतदार आहेत. मंत्री वगैरेंनी उसाच्या जमिनी तिकडे घेतल्या आहेत आणि त्यांची कल्पना अशी आहे की, आपल्याला उसामध्ये फार चांगला फायदा मिळून राहिलेला आहे. आज प्रत्यक्षात त्या भागात स्थिती अशी आहे की बारमाही पाण्यावर पीक घेत असल्यामुळे सगळे जमिनीतील क्षार वर येत आहेत आणि थोड्या दिवसांत त्या जमिनीत गवताचे पातेसुद्धा उगवणार नाही, अशी स्थिती येणार आहे. आज त्यांना काही त्या खर्चाचा अंदाज नाही. बरं चाललेय, असे वाटतेय. Depletion ही काही शेतीच्या बाबतीत अजून मान्य झालेली पद्धत नाही. पण आम्ही आमच्या मॉडेल पद्धतीत रासायनिक, सेंद्रिय खतांचे दोष धरताना, अशा तऱ्हेने विचार करतो, की शेतीचे नुकसान कमीत कमी व्हावे पण त्यानेही भागत नाही. बांधबंदिस्तीचा खर्चही दर ४/५ वर्षांनी करावा

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । १७०