पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/१७२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जेव्हा त्या भावाची हमी देते, त्यावेळी तुम्ही असे नाही म्हणू शकत की तुम्ही फक्त एवढाच कांदा विकत घ्या, बाकीचा आमचा आम्ही विकू. हे चालणार नाही. तुम्ही, आमचे आम्ही बघून घेऊ म्हटले, म्हणजे तुम्ही तो कांदा खाजगी रीतीने बाजारात नेणार आणि मग बाजारातील किमती खाली येणार. तेव्हा तो माल शेतामध्ये तयारच होता कामा नये अशा तऱ्हेचेसुद्धा उत्पादनावरील नियंत्रण, नियंत्रित किमतींच्या मागणीबरोबरच येते, हे लक्षात घ्या.

 

Appropriate technology (सुयोग्य तंत्रज्ञान ) आणि जमिनीप्रमाणेच यंत्रावरील सीलिंग महत्त्वाचे नाही का? प्रक्रियामचे कारखाने हा प्रश्न सोडवायला मदत करतील की नाही?

 शेतकऱ्याच्या शेतमालाला जर रास्त भाव मिळायचा असेल तर साठवणूक, त्यावरील उचल आणि प्रक्रिया या तीनही गोष्टी सारख्याच महत्त्वाच्या आहेत आणि शेवटी भाव याच पद्धतींनी मिळणार आहे. पण आज प्रक्रियेचे कारखाने काढण्याची तुमची ताकद किती आहे? आणि तुमच्यापुढचा प्रश्न किती लाख खेड्यांचा आहे? त्यासाठी किती भांडवलसंचय लागेल? तो कसा करणार? भाव वाढल्याखेरीज भांडवलसंचय नाही आणि त्याशिवाय उद्योगधंदे नाहीत आणि उद्योगधंदे झाल्याखेरीज भाववाढ नाही अशा दुष्टचक्रात आपण सापडतो. हे चक्र आपल्याला फोडायचे आहे. ते आपण रास्त भावाच्या मागणीने फोडतो आहोत. प्रक्रियेचे कारखाने अवश्य काढायला हवेत. उलट मी जेव्हा असे म्हणतो शेतीमालाला भाव वाढवून देणं हा एक कलमी कार्यक्रम नसून ही बहुगुणी गुटी आहे आणि या लहानशा गोळीमध्ये सर्वांगीण विकासाची बीजे आहेत, त्याचा अर्थ हाच आहे.

 दीर्घ मुदतीत शेतमालाला भाव मिळाल्याने दोन महत्त्वाचे परिणाम होतील. उदा. गेल्या वर्षी पहिल्यांदा चाकणला कांद्याला भाव बांधून दिले गेले; ताबडतोब खाजगी शेतकऱ्यांनी आपल्या गहाणवट जमिनी सोडवून घेतल्या. यंदाच्या वर्षी बँकांची आणि सोसायट्यांची कर्ज फिटणार आहेत आणि मला असा आत्मविश्वास वाटतो की, दोन ते तीन वर्षांच्या आत चाकणच्या परिसरात नुसतीच लाल मिरची बाजारात पाठवायच्या ऐवजी निदान तिची भुकटी करून प्लास्टिकच्या पिशवीत भरून देण्याचे कारखाने चालू होतील. तेलाच्या गिरण्याही निघतील. असे अनेक

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । १७४