पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/१७४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हा इतर राजकीय पक्षांनी भरवलेल्या सभांपैकीच एक सभा असेल. शेतकरी संघटना राजकीय पक्ष जरी नसला, तरी पक्षाची मंडळी ज्याप्रमाणे विचार मांडतात, त्याच प्रकारचा विचार येथे मांडला जातो. पण यापलीकडे साम्य नाही. शेतकऱ्यांचा मेळावा म्हणजे जेथे सगळे शेतकरी जमतात. तो कोणत्याही जातीचा, धर्माचा किंवा पक्षाचा असो. त्याची जमीन ५०/६० एकर असो वा ५ एकर असो; किंवा अजिबात जमीन नसल्यामुळे तो शेतमजुरी करणारा असो, ज्यांच ज्यांच आयुष्य शेतीवर अवलंबून आहे अशा सगळ्या मंडळींनी एकत्र यायचे आणि आपल्या व्यवसायातील अडचणींचा विचार करायचा. शेती का फायद्यात चालत नाही? निरनिराळे प्रयोग केले, तंत्रे सुधारली, वरखते वापरली, औषधे वापरली, खर्च अनेक पटींनी वाढला आणि त्याचबरोबर कर्जेच वाढत गेली. पाहावे तेव्हा उत्पन्नाची बाब कमीच का? ज्याने त्याने दारी बसून केवळ विचार करून यातून कसे सुटायचे? एकट्याला परिस्थितीचा मुकाबला करणेही शक्य नाही. म्हणून जगभराच्या सर्व व्यावसायिकांची जी रीत आहे, त्यानुसारच आपण एकत्र येऊन विचार करतो आहोत.
 आपण एकत्र होऊ नये म्हणून फूट पाडण्याचे प्रयत्न चालू आहेत. ते आपण यशस्वी होऊ देता कामा नये. म्हणूनच राजकीय पक्षांचा वारा लागू देऊ नका.

 आणखी एक गोष्ट आधीच स्पष्ट करून ठेवतो की, मेळाव्याचे नियोजन करणारी जी मंडळी असतात ती साहजिकच आलेल्या पाहुण्यांची ओळख करून देतात. त्यांचे मागचे आयुष्य काय होते आणि त्यांनी हे केले आणि ते केले वगैरे सांगतात आणि त्यामुळे विनाकारण अशी कल्पना होते की शेतकऱ्यांच्यामध्ये जी नवीन जागृती होऊ लागली आहे, - आपला उत्पादनखर्च काय आणि आपल्याला प्रत्यक्ष उत्पन्न काय मिळते याबद्दलची जाणीव - ही जागृती किंवा जाणीव कुणी तरी एका माणसाने केली आणि त्या एकट्या माणसाचे हे श्रेय आहे ही चुकीची कल्पना पसरायला लागेल. त्यातून दुर्दैवाने असे घडते की एखाद्या माणसाचे नाव एखाद्या चुकीने का होईना - वर्तमानपत्रात सारखे येऊ लागले की साहजिकच इतर काही व्यक्तींना त्याच्याबद्दल मत्सर, असूया वाटू लागते व त्यामुळे संघटनेची हानी होते. राजकीय पक्षांची एकाच व्यक्तीला मोठे करीत राहण्याची ही वृत्ती इथे नको. माझ्या दृष्टीने मी ही गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. नाशिक, चाकण येथील आंदोलनात शेतकऱ्यांनी १२ दिवस बैलगाड्या ठेवून रस्ता अडवला आणि जो कांदा निव्वळ

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । १७६