पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/१७५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कचऱ्याच्या भावाने जात होता, त्याला ४५ ते ६० रु. क्विं. हा भाव मिळाला. नाशिकच्या आंदोलनात - देशात प्रथमच - १॥ ते १।।। लाख शेतकरी रस्त्यावर आणि रेल्वेवर येऊन बसले. या सगळ्याचे श्रेय कोणाही एका माणसाला नाही, शरद जोशींना नाही. आमच्या नाशिक जिल्ह्यातील कार्यकर्ते मोरे, कराड-पाटील किंवा बागलाण तालुक्यातील रामचंद्र बापू पाटील यांच्यापैकी एकालाही त्याचे श्रेय नाही. हे श्रेय आहे शेतकऱ्याला! आज अनेक वर्षे दुःख, दारिद्र्य सोसल्यानंतर केवळ अजिबात सहन होत नाही आणि यापुढे मरायचेच आहे तर निदान झगडा करून मरावे अशी ऊर्मी जेव्हा देशातील वेगवेगळ्या राज्यातील शेतकऱ्यांना स्वतंत्रपणे झाली तेव्हाच हा लढा उभा राहिला. उभ्या राहिलेल्या लढ्याबद्दल बातम्या देताना, खुणेचा जसा दगड असावा, असे एखाद्या माणसाचे नाव घातले जाते; परंतु कोणाही एका माणसाला या जागृतीचे श्रेय नाही. हे श्रेय फक्त काळाला आहे. माझ्यासारख्या एखाद्या माणसाने आंदोलन चालू करून जर का शेतकऱ्यांशी द्रोह केला, त्यांचा घात केला, तर शेतकरी त्या माणसाला बाजूला सारून आणि प्रसंगी पायदळी तुडवून पुढे जातील. शेतकरी त्या माणसाला बाजूला सारून आणि प्रसंगी पायदळी तुडवून पुढे जातील. शेतकरी आता जागा झाला आहे. कोणीही पुढाऱ्याने त्याला विरोध केला तरी ही जागृती थांबणारी नाही. ही शेतकऱ्यांची, शेतकऱ्यांनी केलेली,शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी जागृती आहे. तेव्हा या सबंध आंदोलनामध्ये कोणाही एका व्यक्तीचे काहीही महत्त्व नाही आणि जरी समजा माझ्यासारखा एखादा मनुष्य, परदेशातील ऐषारामाची नोकरी सोडून या कामाला आला असला तरी त्याचा अर्थ असा नव्हे की म्हणून त्याचे उपकार मानून तो म्हणेल ते तुम्ही खरे म्हणा. नाही! आजपर्यंत शेतकऱ्यांनी हीच चूक अनेक वर्षे केलेली आहे. निवडणुकीच्या आधी पुढारी येतात, आश्वासने देतात. आम्ही त्यांना भुलतो. दारिद्र्य हटविणे कठीण गोष्ट आहे असे ते सांगतात. त्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला. त्यांच्या खांद्यावर मान टाकली आणि या सर्व पुढारी मंडळींनी आजपर्यंत नियमितपणे शेतकऱ्याच्या मानेवरून सुरी फिरवली. शेतीमालाला रास्त भाव मिळू नयेत म्हणून प्रयत्न करणाऱ्यात सर्व राजकीय पक्ष आहेत. शेकडो वर्षे हे प्रयत्न चालले आहेत. पुढारी आले की त्यांना आपण विचारले पाहिजे की बाबांनो, तुम्ही आमच्या गावाला रस्ते, दवाखाने देता, शाळा देता, आमच्या घरावर सोन्याची कौले घालू म्हणता; हा सगळा धर्मदाय, ही सगळी भीक तुम्ही आम्हाला का घालायची? ही भीक घालण्यापेक्षा

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । १७७