पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/१७८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 हीच राजकारणी मंडळी तुम्हाला शेतमजूर-शेतकरी अशी भाषा ऐकवतील या भेदनीतीलाही भुलू नका. संघटनेची भूमिका मी स्पष्ट केलीच आहे. शेतकऱ्याला फायदा मिळाला की मजुरीचेही दर वाढतील. शेतकऱ्याला हे शहाणपण कुणी शिकवायला नको आहे. पण जी शहरातील मंडळी मोलकरणीला फुटक्या कपातून चहा प्यायला देतात आणि न्हाणीघरात जाऊन तिला तो प्यायला लावतात, ती नाहीत, त्या फक्त वेगळ्या पिढ्या आहेत. पण मुद्दा, हे राजकारणी लोक तुमच्यात भांडणे लावण्यासाठी वापरतात. पक्ष, जात, धर्म यापैकी काही मनात आणू नका. शेतकरी तेवढा एक, असे चोख उत्तर राजकारणी मंडळींना द्या.
 राजकीय पक्षांपासून नेहमी जपून राहा, नीट विचार करा. आज तुम्ही ऐकताहात म्हणून जर मी उद्या तुमच्यासमोर मते मागण्यासाठी आलो तर तुमच्या पायातील जोडा काढून मला मारा. हा प्रश्न मते, सत्ता, खुर्ची मिळविण्याचा नाही. कसल्या घाणेरड्या महत्त्वाकांक्षा आहेत या! आमदार, खासदार, मुख्यमंत्री व्हावे म्हणून हे शेतकऱ्यांचा घात करतात. अरे, या देशात ५२ कोटी शेतकऱ्यांना पोटाला अन्न नाही अशी परिस्थिती असताना, जर त्यांना कुठे दोन दिवस सुखाचे येतील असे काही केले, तर त्याला अर्थ आहे. याच्याहून कोणती मोठी महत्त्वाकांक्षा? शेणातल्या किड्याप्रमाणे छोट्या महत्त्वाकांक्षा ठेवू नका. आम्हाला माहिती आहे तुमची पक्ष वगैरे शहाणपण! एक पक्षाचे तिकीट मिळाले नाही की जी मंडळी-एका घाणीवरून माशा दुसऱ्या घाणीवर जाव्यात त्याप्रमाणे - पक्ष सोडतात, ती दुसऱ्या दिवशी येऊन आम्हाला शहाणपणा सांगतात - 'आमच्या पक्षाचे मत असे आहे.' असे का? तेव्हा कोणत्याही पक्षाचा येथे संबंध नाही. आमचे कार्यकर्ते हे सगळ्या पक्षांचे आहेत. कुठल्या ना कुठल्या पक्षात आमच्या गावातील सर्व चांगली, तरुण, उत्साही, अनुभवी मंडळी अडकलेली आहेत. ती निघाली फार चांगल्या बुद्धीने- देशातील दारिद्र्य हटावे या बुद्धीने! पण परिस्थिती अशी झाली की निघावे देवाच्या आळंदीला आणि जाऊन पोचावे चोराच्या आळंदीला! तशी त्यांची गत झाली. तेव्हा बाकीच्या ३९ किंवा १९ कलमांकरिता तुम्ही खुशाल कुठल्याही पक्षात रहा, निवडणुका लढवा. काय वाट्टेल ते करा. या एका कलमासाठी मात्र सर्व पक्षांचे जोडे बाहेर ठेवून या.

 तुम्हाला भाव मिळत नाहीत याचे कारण सर्व राजकीय पक्षांचे ते धोरण आहे. तुमच्या घामावर दुसरी मंडळी मौज उडवताहेत, भाव मिळाले तर ही मौज थांबेल.

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । १८०