पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/१७९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हे भाव भांडून मिळवावे लागतील. 'आमच्या इंदिराबाई तुम्हाला भाव देतील' असे कोणी सांगत येईल. चूक भाव इंदिराबाई देणार नाहीत. आपल्याला या मंडळींनी कोंबड्यासारखे खूप झुंजवले व दाणे काढून नेले. यापुढे पक्षांची भांडणे निवडणुकीच्या वेळी! जेव्हा शेतीमालाला भाव मिळविण्याचा प्रश्न येईल तेव्हा इतर मतभेद मनात ठेवू नका. एक व्हा. अहो शेतकरी ५२ कोटी आहे या देशात. नुसते सगळे जण मिळून थुंकले तरी सगळे शत्रू वाहून जातील.
 राजकीय मंडळी व वृत्तपत्रांमधील टीकाही याच प्रकारची, फूट पाडणाऱ्या नीतीची आहे. जोशी हा विकला गेलेला माणूस आहे असे त्यांनी म्हणायचे व मी नाही, होय म्हणायचे, याला अर्थ नाही. मी नाही म्हटले तरी ज्यांच्या मनामध्ये काही पेरायचे आहे, त्यांच्या मनातले कायमच राहणार आहे. याचे उत्तर शेवटी इतिहास देणार आहे. कोणत्या निष्ठेने संघटना लढा लढते, विकला गेलेला मनुष्य पुनः दीड लाखाऐवजी तीन लाख शेतकरी रस्त्यावर आणायची व्यवस्था करतो का? हे तुमचे तुम्ही ठरवायचे आहे. जर तुम्हाला पटले की मी विकला गेलेला आहे, अप्रामाणिक आहे तर मला बाजूला सारा; पण आंदोलन पुढे चालवा. मात्र आजपर्यंतच्या ज्या मंडळींनी तुम्हाला व्यवस्थितरीत्या कायम फसवले आहे त्यांच्यामागे जाऊ नका. विचारांच्या मागे जा.
 म्हणून महत्त्वाची गोष्ट अशी की संघटनेचे आंदोलन हे संपूर्णतः पक्षीय राजकारणाच्यसा व्यतिरिक्तच चालले पाहिजे. एकदा जर ते राजकारणाच्या चिखलात फसले तर पहिली निवडणूक आल्यावर निम्मे शेतकरी एका व उरलेले दुसऱ्या पक्षाकडे जातील. संघटन खलास होईल. आपला विचार निःपक्षपणे, आर्थिक मागणी म्हणूनच मांडला गेला पाहिजे, तरच तो यशस्वी होईल. राजकारणाच्या प्रश्नावर मी अजिबात तडजोड करीत नाही. आपण स्वच्छ, वेगळे राहावे. हे जर जड जाणार असेल तर आपण मनाची एकच तयारी ठेवा, की असे पक्षीय पाठिंबा असलेले आंदोलन तुम्हाला काहीही मिळवून देऊ शकणार नाही. तुम्हाला पक्ष मिळेल, पण भाव नाहीत.
 तसेच धर्मदायावरही विसंबून राहू नका. आपल्या एक कलमी कार्यक्रमाने ही लाचारी संपणार आहे. आता शेतकऱ्याला ही गोष्ट कळली आहे की त्याचे दारिद्र्य दूर करण्यासाठी कोणाच्या भिकेची, धर्मदायाची गरज नाही. जो माणूस मुंग्यांना साखर घालून व्यापारास जातो तो दिवसभर कुणाचे तरी गळे कापत असतो.

 ■ ■

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । १८१