पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/१८३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माझ्यासारख्या व्यक्तीचे नव्हे, पण शेतकरी संघटनेचेही महत्त्व वाढविण्यासाठी मुळीत नाहीत. सतत नाकारल्या गेलेल्या न्यायाच्या मागणीसाठी अपरिहार्यपणे करावी लागणारी- एका दृष्टीने लादली गेलेलीच म्हण- ती एक कृती आहे. आज समोर असलेल्या निगरट्टांकडे पाहता ती अनिवार्य आहे. नुसत्या अर्ज विनंत्यांनी हे काम होण्यासारखे असते तर मी तुम्हाला रस्ता रोखायला बोलाविले नसते आणि समजा मी बोलाविले असते तरी तुम्ही नक्कीच आला नसता.
 एक गोष्ट पुन्हा एकदा स्वतःशी स्पष्ट करून घ्या. आपला लढा हा कोण्या एका शासनाविरुद्ध वा पक्षाविरुद्ध नाही. तसे असते तर आपले काम खूपच सोपे झाले असते. शासन ताब्यात घेणे हे आपले ध्येयही होऊ शकले असते. म्हणजे आपल्या हालचालींना एक सर्व परिचित असे राजकारणाचेच अधिष्ठानही प्राप्त झाले असते. पण आपला लढा एक व्यवस्थेच्या विरोधात आहे आणि तो पूर्णपणे आर्थिक पातळीवरील आहे. आपल्याला शासन ताब्यात घ्यायचे किंवा राज्य मिळवायचे नाही. आज शेतीव्यवसाय हा पूर्णपणे पराधीन झाला आहे. ही पराधीनता आपल्याला काढून टाकायची आहे. त्याचसाठी आपल्याला फक्त आपल्या शेतीमालाचे रास्त भाव मिळवायचे आहेत. तसं पाहिले तर आपली मागणी अतिशय साधी व निरुपद्रवी आहे.
 आपला प्रयत्न गरीब शेतकऱ्याला श्रीमंत करण्याचा नाही. आपला प्रयत्न खरा आहे तो देशातील दारिद्र्य दूर करण्याचा. आपल्या हालचाली कधीही देशाचे स्वास्थ धोक्यात आणणाऱ्या नाहीत. ज्यांच्या दुस्थितीमुळे देशात दारिद्र्य नांदत आहे त्या शेतकऱ्यांची आर्थिक हलाखीतून मुक्तता हे आपले ध्येय आहे. त्यासाठी झगडणे व ते हस्तगत करणे ही कृती देशविघातक कशी बरे होईल?
 तेव्हा सध्यातरी आपण सर्वांनी रास्त भावाच्या एक कलमी मागणीवर एकारले पाहिजे. जितके आपण जास्त संघटित होत जाऊ तितके या मागणीच्या पूर्ततेच्या जास्त जवळ जाऊ. म्हणजेच देशाच्या दारिद्र्याला दूर दूर हटवत नेऊ.

 ■ ■

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । १८५