पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/२७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हॉटेलात राहतात आणि इंजिनं विकली जावीत म्हणून पाच, दहा, पंधरा हजार रुपयांच्या मेजवान्या देतात. हा खर्च त्याला कारखान्याकडून भरून मिळतो. याचा अर्थ तुम्ही जेव्हा इंजिन विकत घेता तेव्हा त्याच्या किमतीत तुम्ही या मेजवानीची वर्गणी भरता. हे जर मेजवानीचे पैसे इंजिनाच्या उत्पादन खर्चात येतात तर आमच्या कारभाऱ्याने खाल्लेल्या चहा मिसळीचे पैसे शेतमालाच्या उत्पादन खर्चात का येऊ नयेत? यायलाच हवेत. आम्ही उत्पादन खर्चात व्यवस्थापनाचा खर्च कमीत कमी धरला आहे-एका एकराला एक दिवसाला फक्त एक रुपया धरला आहे.

 दुसरा महत्त्वाचा खर्च म्हणजे 'धोका.' आपल्याकडच्या पावसाच्या अनिश्चितपणामुळे प्रत्येक वर्षी जरी तितकीच ज्वारी पेरली तरी हंगामाच्या शेवटी ज्वारीचे पीक किती मिळेल हे कुणाही शेतकऱ्याला सांगता येत नाही. कापणी सुरू व्हायच्या आधी महिनाभरसुद्धा तो केवळ अंदाजच सांगत असतो. शेवटच्या दिवसापर्यंत काय होईल सांगता येत नाही. कारण पाऊस, पाखरं, रोग काहीही असू शकतं. एखाद्या कारखान्यात चाक तयार करीत असतात. दहा चाकं तयार केली आणि त्यातली जर साधारणपणे तीन तुटकी निघत असतील तर त्यांचा खर्च कारखानदार स्वतःच्या खिशातून भरत नाही. तो दहा चाकांचा खर्च सात चाकांवर मारून किंमत ठरवतो. एका एकरात साधरण २०/२५ पोती (क्विंटल) ज्वारीच पीक आलं तर बंदा रुपया पीक आलं असं आपण म्हणतो. आपण वीस पोत्याचा खर्च हिशोबासाठी धरू. पीक काही येणार असलं तरी भांडवली खर्च, बियाणंमशागतीचा खर्च, यात काही फरक पडत नाही. मग पीक कमी आलं तर सरासरी खर्चाचा आकडा काढणार. मग ज्वारीच्या एका क्विंटलचा उत्पादन खर्च काढताना उत्पादन किती धरायचे? गेल्या सलग ७ वर्षांतील पिकांचे आकडे जमा केले तर कोरडवाहू भागात सरासरी पीक फक्त ५३ पैसेच येतं असं लक्षात येतं. म्हणजे ७ वर्षांच्या काळात पीक सरासरी ४७ पैशांनी बुडतं. मग इतका खर्च केल्यावर पीक किती येईल हे कसं काढायचं? २० पोती हे बंद रुपया पीक असलं तरी उत्पादन खर्च किती पिकातनं वसूल करायचा हे काढण्यासाठी इतकं पीक धरून चालायचं नाही, तर प्रत्यक्षात सरासरी पीक किती हे धरायला पाहिजे किंवा आपण कोणत्या प्रकारची जमीन निवडली आहे, बी-बियाणे काय प्रकाराचं पेरल आहे आणि खतं कोणत्या प्रमाणात घातली आहेत लक्षात घेऊन त्यात काय पीक आलं असतं ते धरून त्यातून सरासरीचे ५३ पैसे पीक हिशोबात घेतलं पाहिजे. उदाहरणार्थ,

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । ३०