पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/३२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उत्पादन खर्च काढता येईल. या पद्धतीचा फायदा म्हणजे उत्पादन खर्च काढण्याच्या 'सरासरी' पद्धतीतील दोष बव्हंशी दूर होतील. वेगवेगळ्या भागातील उत्पादन खर्चामध्ये जी तिपटीपर्यंत तफावत येते ती दूर होईल. औषध फवारणीचा हेक्टरी खर्च रु.१०.७३ यासारखे वेडेवाकडे, वस्तुस्थितीपासून फार दूरचे खर्चाचे आकडे येणार नाहीत. मिळणाऱ्या किमतीतून शेतकऱ्याला शेती सुधारण्यास वाव मिळेल. आज ज्यांना चांगल्या पद्धतीने शेती करणे जमत नाही त्यांना उद्या तरी जमेल.

 हा झाला उत्पादन खर्चाच्या तांत्रिक बाजूचा अभ्यास. उत्पादन खर्च भरून निघाला नाही तर काय होईल? एक हजार रुपयांचा माल आणून पाचशे रुपयांना विकणाऱ्या वाण्यासारख दिवाळं वाजेल. आपल्याकडील शेतकऱ्यांचं दिवाळं वाजून ते शहरात पोट भरण्यासाठी जातात हे कुणीही मान्य करील. सगळेच जात नाहीत हे मान्य. मग प्रत्यक्षात काय होत? तर सध्या मिळत असलेल्या किमतीत चालू खर्च जेमतेम भरून निघतो. पण भांडवली खर्च अजिबात भरून निघत नाही हा आजचा अनुभव आहे. त्यामुळे शेतकरी भांडवल खाऊनच जगतो असं म्हणावं लागतं. जर गोठा पडला किंवा बैल मेला म्हणून नवीन घ्यावा लागला, नवीन औत-आवजार घ्याव लागली, घरात काही खर्चाचा प्रसंग आला, आजार उद्भवला, कुणाचं लग्न असलं किंवा जमिनीच्या बांधबदिस्तीचं काम निघालं तर अशा खर्चासाठी खासगी सावकार, सोसायटी किंवा बँकेकडून जमीन गहाण ठेवून कर्ज घ्याव लागतं आणि शेतीत फायदा होत नसल्यामुळे हे कर्ज फेडणाऱ्यांची संख्या जवळजवळ शून्य आहे. म्हणूनच शेतकरी भांडवल खाऊन जगतो असं म्हणावं लागतं. एखाद्या घरातील कुणी शहरात नोकरीला असतो. तो जे काय ५-५० रुपये मनिऑर्डरने पाठविल त्यावर गुजराण करावी लागते. मावळ तालुक्याच्या डोंगराळ भागातील प्रत्येक घरातील एक मनुष्य मुंबईत आहे. ते कचेरीतल्या लोकांना जेवणाचे डब्बे पोहोचविण्याचे काम करतात आणि घरी पैसे पाठवितात. हे डबेवाले मावळ भागातील भात ग्राहकाला स्वस्त भावात देतात आणि त्यांची घरे मनिऑर्डरी आणि जमिनीच्या गहाणवटीपोटी घेतलेल्या कर्जावर चालतात. आता तुम्ही म्हणाल की शेतकऱ्याला फक्त शारीरिक श्रम करावे लागतात. त्याचे श्रममूल्य ठरवताना त्यांची बौद्धिक श्रमांशी तुलना कशी करता येईल? शेतकरी शेतीचे काम उपयोग करतो. शेतकऱ्याचे सामान्यज्ञान अधिक असते. खगोलशास्त्राची, आकाशातील नक्षत्रे आणि ग्रह यांची माहिती शेतकऱ्याला किती आहे आणि शहरातल्या शिकलेल्या, कॉलेज

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । ३५