पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/३८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शेताला पाणी देण्याची वेगळी काही व्यवस्था करणं शक्य नाही असे सगळेच, जवळ जवळ ९० टक्के शेतकरी आहेत. असे एकाच भागातले शेतकरी त्याच त्याच वेळी तीच तीच पिकं घेतात. ज्वारी निघाली म्हणजे सगळ्यांची ज्वारी एकाच वेळी निघते. कापूस निघाला म्हणजे सगळ्यांचा कापूस एकाच वेळी निघतो आणि मग सगळ्यांचा एकाच वेळी निघालेला माल एकाच वेळी बाजारात जाऊन पडला की त्याची किंमत खाली येते. म्हणजे पावसाचा नक्की अंदाज नसल्यामुळे, नेम नसल्यामुळे आपल्या उत्पादनाचा सरासरी खर्च वाढतो आणि पाऊस ठराविकच वेळात पडत असल्यामुळे आपल्या मालाच्या किमती खाली येतात. अशा तऱ्हेने एका बाजूला खर्च वाढतो आणि दुसऱ्या बाजूला किमती खाली पडतात. अशा कात्रीमध्ये आपण शेतकरी निसर्गतःच सापडतो. हे झालं एक महत्त्वाचं अस्मानी संकट. त्याशिवाय रोगराई, कीड, टोळधाड, वादळे, खराब बियाणे, पेरणीतील उणिवा अशा अनेक कारणांनी पिकांवर परिणाम होतो. आस्मानी संकटांचा आपल्याला सगळ्यांनाच चांगला अनुभव आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल जास्त बोलण्याची जरूरी नाही.

 आजच्या काळात अस्मानी संकटांशी मुकाबला करणे अशक्य नाही. आज मनुष्य चंद्रावर जाऊ शकतो किंवा जिथं दहा-दहा बारा-बारा फूट बर्फ वर्षभर असतं अशा सैबेरियासारख्या ठिकाणीसुद्धा शेती होऊ शकते. तंत्रज्ञान इतकं पुढे गेलेलं आहे. अशा काळामध्ये केवळ निसर्ग आपल्याला अनुकूल नाही म्हणून मनुष्य काही अडून राहत नाही, त्याच्यावर मात करता येते. उदाहरणार्थ, पावसाच्या हंगामीपणामुळे एकाच वेळी पिकं येतात आणि आपल्याला ती एकाच वेळी बाजारात न्यावी लागतात आणि भाव खाली येतात. ठीक आहे. मग आपण ती एकाच वेळी बाजारात न्यायची नाहीत. शेतीमाल साठविण्याची व्यवस्था करावी, त्याला कीड वगैरे लागणार नाही हे बघावं. शेतीमाल बाजूला ठेवावा. आपली जर ऐपत असेल तर आपण थांबू शकतो; पण थांबायची ऐपतच येत नाही. उचल मिळविण्याची व्यवस्था होत नाही. साठवणुकीच्या ऐवजी आपण शेतीमालावर काही कारखानदारी करून वेगळ्या स्वरूपात ते साठविण्याची व्यस्था करू शकतो. टोमॅटोचे उदाहरण घ्या. गेल्या फेब्रुवारीच्या सुमारास चाकणच्या बाजारपेठेत टोमॅटो शेतकऱ्यांना तीन पैसे किलोच्या दरानं विकावा लागला. नंतर मे-जून मध्ये टोमॅटो भाव किलोला ९ ते १० रुपये झाला. फेब्रुवारीत ज्यावेळी टोमॅटोला ३ पैसे भाव मिळतो त्यावेळी जर

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । ४१