पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/५४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माल लागतो तो स्वस्तात स्वस्त मिळवता आला पाहिजे, कारखान्यात काम करणारे जे कामगार असतात त्यांना कमीतकमी पगार देऊन त्यांच्याकडून जास्तीत जास्त काम करून घेता आलं पाहिजे आणि कारखान्यात तयार झालेला माल जास्तीत जास्त किमतीत ग्राहकांना देता आला पाहिजे. कारखाना चालवताना शेतकरी, कामगार आणि ग्राहक या तिघांची लूट करण्यात येते. हे पहिल्यापासून चालत आले आहे. या तिघांच्या लुटीपैकी कामगारांचे जे शोषण होते त्याचा विचार फार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. मार्क्सवाद, कम्युनिझम यासारखं तत्त्वज्ञान त्यातूनच निघालं. ग्राहकांचं शोषण होतं म्हटल्यावर, विशेषतः सुधारलेल्या देशात ग्राहकांच्या चळवळी उभ्या राहिल्या; परंतु कच्च्या मालाचं जे शोषण होतं त्याचा विचार आजपर्यंत फार थोड्या प्रमाणात झाला. कच्च्या मालाचं शोषण थांबावं म्हणून कोणत्याही तऱ्हेची संघटना प्रभावीपणे उभी राहिली नाही. आपण कामगारांच्या शोषणाच्या संदर्भात भांडवलवाद - समाजवाद किंवा भांडवलवाद साम्यवाद असे शब्द वापरतो. पण कच्च्या मालाच्या शोषणामध्ये भांडलवाद आणि साम्यवाद यात काहीही फरक नाही. भांडवलवादी देशामध्येसुद्धा शेतकऱ्यांकडून कच्चा माल स्वस्तात स्वस्त घेऊन कारखानदारीचा फायदा करून द्यावा असं धोरण आहे आणि रशियासारख्या कम्युनिस्ट - साम्यवादी देशामध्येसुद्धा शेतीमध्ये तयार होणारा माल कमीत कमी किमतीत मिळवू घेतला पाहिजे, भांडवल तयार केलं पाहिजे, या भांडवलाच्या साहाय्याने उद्योगधंद्याची वाढ केल्यानंतर कामगारांचं वर्चस्व संबंध अर्थव्यवस्थेवर व्हावं अशी विचारसरणी आहे, त्या दृष्टीने पाहता शेतकऱ्यांच्या शोषणाचा प्रश्न भांडवलवादी आणि कम्युनिस्ट देशात सारखाच आहे; परंतु शेतकऱ्यांच्या शोषणाचं हे धोरण समाजवादी देशातही सारखाच आहे; परंतु शेतकऱ्यांच्या शोषणाचं हे धोरण समाजवादी देशातही कायमचं राहिलं आहे. आपल्याला थोडाफार अनुभव आहेच.

 रशियामध्ये, पूर्व युरोपातील देशांत हा वाद फार गाजला आहे. रशियामध्ये जेव्हा एकदा शेतकऱ्यांनी गव्हाचे भाव बांधून मागावेत असा विचार केला तेव्हा स्टालिनने उच्चारलेल एक वाक्य प्रख्यात आहे. स्टालिननं म्हटलं, 'हे शेतकरी आज गव्हाचेच भाव वाढवून मागतायत. ही मागणी जर आपण मान्य केली तर ही मंडळी उद्या सोन्याची घड्याळं मागतील.' शेवटी रशियातला हा प्रश्न, जे शेतकरी त्यातल्या त्यात जास्त उत्पादन करून बाजारात धान्य पाठवीत असत त्या सर्वांवर

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । ५७