पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/५६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कारखानदारीची भरभराट झाली. ही व्यवस्था जवळ जवळ २०० वर्षे टिकली. या २०० वर्षात केवळ हिंदुस्थान नव्हे तर इतर अनेक देश पार रसातळाला गेले. एकेकाळी वैभवात असलेले देशसुद्धा रसातळाला गेले.
 परंतु जागतिक घडामोडी अशा होत गेल्या की, दुसऱ्या महायुद्धानंतर म्हणजे सन १९४७ च्या आसपास इंग्लंडसारख्या देशांना त्यांनी जी राजकीय सत्ता हाती ठेवली होती ती टिकवणं अशक्य झालं. त्यामुळे जगभर हिंदुस्थानसारख्या ज्या सगळ्या वसाहती होत्या त्या हळूहळू स्वतंत्र होऊ लागल्या. हे स्वातंत्र्य केवळ आहे. त्याचप्रमाणे केवळ आपण लढा केला म्हणून, म. गांधींनी स्वातंत्र्य मिळवून दिले याही कल्पना चुकीच्या आहेत. जगातल्या इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, अमेरिका या सगळ्या देशांच्या ज्या ज्या काही वसाहती होत्या त्या दुसऱ्या महायुद्धामुळे १९४५ ते १९५२ या सात वर्षांत इतर सर्व देशांबरोबर स्वतंत्र्य झाल्या. त्यांच्या असं लक्षात आलं की, सैनाच्या ताकदीवर किंवा राजकीय ताकदीवर या बाजारपेठा आता हातात ठेवणे शक्य नाही त्यामुळे त्यांनी सर्व वसाहती मोकळ्या केल्या.
 तरीसुद्धा निघता निघता या मंडळींनी अशी एक व्यवस्था या देशात चालू ठेवण्याचा प्रयत्न केला की, जरी राज्यसत्ता गेली तरीसुद्धा व्यापारात जो फायदा होता तो जास्तीत जास्त प्रमाणात चालू राहावा. कारण त्यांचा येण्याचा मुख्य हेतू व्यापारी होता, राजकीय नव्हता. एव्हाना वसाहतवादी राष्ट्रातील कारखानदारांना प्राथमिक उद्योगधंद्यात फारसे स्वारस्य राहिलेले नव्हते. कारखान्यांना लागणारा माल तयार करणाऱ्या जड उद्योगधंद्यांकडे ते वळले होते. तेव्हा जुन्या वसाहतीतील किरकोळ कारखानदारी वाढायला त्यांचा फारसा विरोध नव्हताच. उलट त्यांच्या जड उद्योगधंद्याच्या भरभराटीसाठी अशा स्थानिक कारखानदारीच्या विकासासाठी हातभार लावायलासुद्धा ते तयार होते.

 उदाहरणार्थ, हिंदुस्थानसारख्या देशात काय झालं? व्यापार आणि कारखानदारीच्या साहाय्यानं जी मंडळी वर आली होती त्याच्या संगनमतानं आणि इथं जे शासन आलं त्याच्या संगनमतानं नवी व्यवस्था अशी सुरू झाली की ज्यामध्ये पूर्वी कच्चा माल ज्या भावानं विकत घेतला जात होता त्याच प्रकारच्या भावानं विकत घेतला जाऊ लागला. हळूहळू या देशात कारखाने तयार केले गेले आणि त्या कच्च्या मालाचे रूपांतर पक्क्या मालामध्ये याच देशात होऊ लागले

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । ५९