पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/५७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणि तयार झालेला माल गरीब शेतकऱ्यांना, सर्वसामान्य जनतेला पुन्हा महागात महाग विकला जाऊ लागला. यात फरक काय पडला? कारखानदारी कुठं व्हायची त्याची फक्त जागा बदलली; त्याचा फायदा कुणाला व्हायचा ती माणसं थोड्या प्रमाणात बदलली. पण शेतकऱ्याच्या शोषणाची, दारिद्र्याची, हातभाग्याची व्यवस्था तीच राहिली. म्हणूनच इंग्रजांचं राज्य गेलं ही कल्पना महत्त्वाची नाही. इंग्लंडच्या ऐवजी दुसरंच राज्य चालू झालं आणि ते तितकंच वाईट होतं.

 ही कल्पना समजावून सांगण्याकरता आपण असं म्हणतो की, १९४७ साली भारतावरचं इंग्लंडचं राज्य गेलं आणि इंडियाचं सुरू झालं. 'इंडिया आणि भारत' ही काय कल्पना आहे? या कल्पनेवर पुष्कळ वादविवाद होतो आणि पुष्कळांना ही कल्पना समजायला कठीण जाते. आपल्या घटनेमध्ये आपल्या देशाला दोन नावे आहेत. इंडिया म्हणजे भारत असं त्यामध्ये आहे. ही दोन्ही नावं कोणत्याही वेळी वापरली तरी चालतात. आपल्या देशाचं मूळचं, जुनं नाव भारतच आहे. परदेशात याचं नाव इंडिया का पडलं त्याला मोठा इतिहास आहे. म्हणून याला इंडियाच म्हणतात. इंग्रजीमध्ये इंडिया आणि वेगवेगळ्या भाषांत आणखी वेगवेगळी नाव आहेत. आपल्या देशामधील हा जो भाग आहे, ज्यातील मंडळी पूर्वी इंग्रज ज्या पद्धतीनं कारखानदारी चालवीत असत त्याच पद्धतीनं शेतीचे शोषण करून चालवतात, त्या पद्धतीचं राहणीमान ठेवतात, त्या प्रकारचं शिक्षण घेतात आणि एकूणच त्यांच्या पद्धतीनं विचार करतात तो म्हणजे 'इंडिया' या इंडियाला आणि भारताला अशी काही भौगोलिक सरहद्द नाही की इथून इथं इंडिया आणि त्या बाजूला भारत असं कुणाला म्हणता यावं. काहींच्या मनात गोंधळ होतो की ग्रामीण भाग म्हणजे भारत शहरी भाग म्हणजे इंडिया. पण ही कल्पना चुकीची आहे. शहरात जाताना जिथं जकातनाका लागतो तिथं इंडियाची हद्द सुरू होते ही कल्पनाच चुकीची आहे. या शहरांमध्येसुद्धा काही एक वेगळी प्रवृत्ती आहे. मग ती आर्थिक असो, सामाजिक असो, सांस्कृतिक असो किंवा शैक्षणिक असो. ती इतकी वेगळी आहे की, त्या माणसांमध्ये आणि बाकीच्या ग्रामीण देशामध्ये काहीही साम्य राहत नाही. प्रचंड मजल्या-मजल्यांच्या इमारती, ऐषआरामाच्या सुखसोयी असं राहणीमान मुंबईसारख्या शहरात आहे. तर इकडे कोट्यवधी लोक कुडांच्या फाटक्या, गळक्या झोपडीतून वर्षानुवर्षे राहतात. शहरांमध्ये सिनेमासारखी करमणुकीची साधने अमाप आहेत. खेड्यात काय आहे? शहरांमध्ये वाहतुकीसाठी गुळगुळीत रस्ते तयार

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती ।६०