पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/५९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केले तर या रोगांचे या खेड्यांतून उच्चाटन होईल. प्रत्येक गावाला एका वर्षासाठी ५००० रुपये म्हणजे १७ गावांना म्हणून ८५ हजार रुपये लागतील. शहरांमधली दवाखान्यांतून मोठी यंत्रसामग्री आणण्यासाठी ज्या रकमा खर्च केल्या जातात त्या मनानं ८५ हजार रुपये म्हणजे अगदी किरकोळ रक्कम पण तीही आपल्याला उभी करता येत नाही.
 पैशाच्या दृष्टीनं ग्रामीण भागात शेतकऱ्याला किंवा शेतमजुराला काय मिळकत होते? संबंध वर्षात त्याला चार महिनेच काम मिळतं असं गृहीत धरलं तर त्याची मिळकत महिना ४५ रुपयांपेक्षा जास्त होत नाही. शहरांकडे पाहा. तिथं काही कारखान्यांची उदाहरणं अशी आहेत की तिथं केवळ झाडू मारण्याचं काम करणाऱ्या कामगारालासुद्धा महिन्याला जवळजवळ १००० रुपये पगार आहे. पुण्यामुंबईत किंवा इथं जे थोडे शिकलेले लोक आहेत त्यांच्या कानावर परदेशात काय पगार मिळतो याचे आकडे येतात. 'अमक्या अमक्याला अमेरिकेत १५००० च्या वर पगार मिळतो' असं कळलं की त्यांना वाटतं, 'काय त्याला भयंकर पगार मिळतो!' अशीच भावना ग्रामीण भागातील मजुराची होते. त्याला जर सांगितलं, 'शहरात झाडूवाला महिन्याला १००० रु. पगार घेतो.' तर तो म्हणतो, 'काय भरमसाट मिळकत आहे त्याची!' तुम्ही अमेरिका आणि आपल्या देशातील 'इंडिया' यांची वेगवेगळ्या दृष्टीने तुलना करून पाहा. जिथं जिथं अमेरिका आणि इंडियात दरी दिसेल, त्याच प्रकारची दरी इथं इंडिया आणि भारत यांच्यामध्ये आहे. साम्य काहीच नाही. आज शहरांमध्ये एकीकडे चांगलेचुंगले कपडे घालून जाणारी माणसंही दिसतात. तर दुसऱ्या बाजूला अगदी गाठीगाठीचे कपडे घालून जाणारी माणसंही दिसतात. ग्रामीण भागामध्ये तर परिस्थती त्याहूनही भयानक दिसते. एकाच देशामध्ये, पुढारलेल्या देशामध्ये आपल्याला हा जो काही फरक दिसतो त्याचे कारण असं की आर्थिकदृष्ट्या प्रत्यक्षात आपल्या देशाचे दोन भाग झालेले आहेत. झेंडा एकच आहे, राष्ट्रगीत एकच आहे, राष्ट्रपती एकच आहे, राष्ट्रपती एकच आहे - सगळं एकच आहे - वरवरच्या खुणा सगळ्या एकच आहेत; परंतु आर्थिकदृष्ट्या या देशाचे असे दोन भाग पडले आहेत की, ज्याच्यामधील एक भाग हा दुसऱ्या भागाच्या शोषणावरच जगतो आहे आणि सतत जास्तीत जास्त शोषण करीत चालला आहे आणि दुसऱ्या भागाचं मात्र शोषण होतच आहे.
  शोषक म्हणजे 'इंडिया' आणि शोषित म्हणजे 'भारत.'

 ■ ■

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । ६२