पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/६०

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 प्रकरण : ६


 'भारत' विरोधी प्रचलित उद्योगनीती


 आर्थिकदृष्ट्या या देशाचे जे दोन भाग पडले आहेत त्यातील शोषक 'इंडिया' 'भारता'चे - शोषण अनेक परींनी करीत आहे. या देशात राबविली जाणारी उद्योगनीती ही अशाच उद्देशाने राबविली जाते.

 आपल्या देशामध्ये उद्योगधंद्यांची वाढ व्हावी की न व्हावी? काही लोकांचा उद्योगध्णंद्यांच्या वाढीला विरोध आहे. आपल्या उद्योगधंद्यांच्या वाढीला विरोध नाही. उद्योगधंदे निर्माण व्हायलाच पाहिजेत. मोठमोठे उद्योगधंदे निर्माण व्हायला लागले तरच जसजशी लोकसंख्या वाढत जाईल तशी तशी ती शेतीवरून काढून या उद्योगधंद्यांमध्ये रोजगारावर लावता येईल. तेव्हा उद्योगधंदे वाढायलाच पाहिजेत. मग अर्थशास्त्रज्ञांचं म्हणणं असं की, 'उद्योगधंदे वाढायला पाहिजे असतील तर त्याच्याकरता या देशातील भांडवल वाढायला पाहिजे. त्यासाठी बचत व्हायला पाहिजे आणि शेवटी अर्थशास्त्रदृष्ट्या भांडवल हे फक्त शेतीतूनच तयार होऊ शकतं.' कारखान्यामध्ये फायदा होतो, पण तो रुपया पैशातला असतो. वस्तूच्या रूपातला फायदा कारखान्यात तयार होत नाही. कारखान्यात एखादी वस्तू आली तर तिचं फक्त स्वरूप बदललं जातं. वेगळी नवीन वस्तू तयार होत नाही. नवीन वस्तू तयार होण्याची म्हणजे एका दाण्याचे शंभर दाणे होण्याची किमया फक्त शेतीतच होऊ शकते. म्हणून खऱ्या अर्थाने वस्तूच्या रूपातील बचत ही फक्त शेतकऱ्यांच्या शेतामध्येच होते. म्हणून मग अर्थशास्त्रज्ञ म्हणतात आणि आपल्या सर्व पंचवार्षिक योजनांमधील हा विचार आहे की, 'शेतीमध्ये भांडवल निर्माण होते. हे भांडवल जास्तीत जास्त प्रमाणात वापरून उद्योगधंदे चालू केले पाहिजेत.' याच्याबद्दल काहीही वाद असूच शकत नाही. जर भांडवल फक्त शेतीमध्येच तयार होते आहे आणि उद्योगधंदे सुरू करायचे आहेत त्याला भांडवल लागतं तर जिथं भांडवल आहे तिथून ते घेतलंच पाहिजे. तुम्ही म्हणाल, 'मग इंडियावाले जे करतात त्यात

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । ६३