पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/६१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चूक काय?' चूक अशी आहे - शेतीमधनं भांडवल तयार करून ते उद्योगधंद्यात नेलं पाहिजे हे बरोबर, पण शेतीमधनं भांडवल नेलं पाहिजे म्हणजे शेतकऱ्याकडनं नेलं पाहिजे असं नाही. शेतीमध्ये तयार झालेलं भांडवल जर शेतकऱ्याकडेच राहिलं आणि ग्रामीण भागातच उद्योगधंदे सुरू करायला त्याला प्रोत्साहनं दिलं तर देशामधल्या उद्योगधंद्याची - कारखान्यांची वाढ होईल. एवढंच नव्हे तर आज ज्या पद्धतीने उद्योगधंद्यांची वाढ चालली आहे त्यापेक्षा चांगल्या पद्धतीने होईल. याचा अर्थ समजून घेण्यासाठी आजच्या उद्योगव्यवस्थेतील काही दोष आणि शेतकऱ्यांच्या हाती भांडवल राहिलं तर ते कसे दूर होतील ते सांगतो.

 पहिला दोष म्हणजे - आजच्या व्यवस्थेमध्ये शेतीमधील भांडवल शहरांत - इंडियात नेऊन तिथल्या काही कारखानदार, व्यापारीवर्गाच्या हाती सोपवलं याकरता ते कारखाना आपला स्वतःचा फायदा कसा होईल याचा विचार करतात. याकरता ते कारखाना कसा चालू करतात? ते परदेशात जाऊन तिथं कोणती यंत्रसामग्री, तंत्रज्ञान मिळतं हे पाहतात आणि अशा तऱ्हेचे कारखाने चालू करतात की जे या देशाला खरोखरीच निकडीचे नाहीत - या देशाला म्हणजे बहुसंख्य लोकांना. उदाहरणार्थ, नायलॉनचे कपडे किंवा टेरीकॉटचे कपडे अशा तऱ्हेचा माल बनविणाऱ्या कारखान्यांची या देशाला काहीही गरज नाही. आपल्या देशामध्ये रंगीतच काय पण काळ्या - पांढऱ्या टेलिव्हिजनचीसुद्धा काही आवश्यकता नाही. पण आम्ही ते पहिल्यांदाच तयार करतो आणि लोकांच्या नेहमीच्या गरजेच्या ज्या वस्तू आहेत त्यांच्याकडे लक्षच देत नाही. हा झाला सध्याच्या उद्योगव्यवस्थेचा पहिला दोष. देशाच्या संदर्भात ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत त्या तयार होत नाहीत. उदाहरणार्थ, जो कच्चा माल वापरून नायलॉनचे कपडे, कृत्रिम धाग्यांच्या वस्तू, प्लास्टिकच्या वस्तू तयार होतात तोच पदार्थ वापरून पी.व्ही.सी. च्या नळ्यापाईप मोठ्या प्रमाणावर तयार करता आल्या असत्या आणि जर का अगदी लहान पाईप - ५ मि.मी.७ मि.मी. १० मि.मी. चे शेतकऱ्यांना अत्यंत स्वस्त दरामध्ये उपलब्ध करून देता आले असते तर आज जो जंगलवाढीचा प्रश्न आपल्या देशामध्ये आहे तो फार मोठ्या प्रमाणावर सुटला असता. आज आम्ही कोरडवाहू भागामध्ये झाडे लावण्याचा प्रयत्न अनेक वेळा करतो आणि उन्हाळ्यात जर त्यांना पाणी पुरवण्याबद्दल काही अडचणी निर्माण झाल्या म्हणून तीन वर्षात १०० पैकी वीसच झाडं जगली, तर आम्ही म्हणतो फार मोठ काम झालं. याकरता इस्त्रायलसारख्या

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । ६४