पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/६२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

देशामध्ये थेंबाथेंबानं पाणी पडण्याची योजना आहे. म्हणजे पाण्याचा नाश होत नाही. सगळ्या झाडांच्या रांगामध्ये एक एक लांब नळी असते. तिच्यामधून प्रत्येक झाडाच्या बुंध्याशी एक टोक काढलेलं असतं. दर चार-पाच मिनिटांनी एक थेंब त्यातून बाहेर सोडला जाईल अशी योजना केलेली असते. आज आपल्या शेतकऱ्याला ही योजना परवडणं शक्य नाही. कारण ५ मि.मी. चा प्लास्टिक पाईप घ्यायचा झाला तर त्याला फुटाला सव्वा रुपया इतकी किंमत मोजावी लागेल. इस्त्रायलमध्ये हा पाईप अक्षरशः वाटण्यात आला. तिकडे वाळवंटामध्ये बागा उभ्या राहिल्या आणि आपल्याकडे मात्र कोरडवाहू जमिनीत झाडं जगवणं कठीण जातं.

 कारखान्यांबद्दल बोलताना मी आता टेलिव्हिजनाचा उल्लेख केला. समजा शहरामधील लोकांच्या ऐषआराम, सुखसोयीच्या संदर्भात कारखाने काढायचे झाले तर कोणते कारखाने काढावेत म्हणजे त्यांच्या ऐषआरामासाठी नव्हे पण आपली मिळकत वाढविण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांना उपयोग होईल? रेफ्रिजरेटर बनविण्याचा कारखाना या दृष्टीने युक्त होईल. रेफ्रिजरटरमध्ये वस्तू – भाजी, दूध वगैरेसारखी ठेवली तर ती कितीही दिवस टिकते. तर या रेफ्रिजरेटर्सचे प्रचंड प्रमाणावर उत्पादन करून ते घरोघर अत्यंत स्वस्त दरात किंवा भाड्याने किंवा फुकटसुद्धा वाटता आले असते तर शेतीमालाचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणावर सुटला असता. आज शेतीमालावर प्रक्रिया करणारे कारखाने आपल्या देशात मोठ्या प्रमाणात वाढू शकत नाहीत आणि घरोघरी फ्रीज नसल्यामुळे स्वस्त प्रकारच्या प्रक्रियासुद्धा आपल्या देशात होऊ शकत नाहीत. ज्या देशात शेतीमालाला भाव मिळू लागलेला आहे आणि म्हणून शेतीतून तयार झालेलं भांडवल शेतकऱ्यांच्याच हातात राहू लागलं आहे तिथं अत्यंत स्वस्त प्रकारच्या प्रक्रिया शेतीमालावर व्हायला लागल्या आहेत. उदाहरणार्थ, तुमचा माल घेऊन त्यामध्ये जंतु राहणार नाहीत अशी काळजी घेऊन तो छोट्या छोट्या प्लास्टिकच्या पिशव्यामध्ये भरून लगेच थंड करायचा किंवा पिशवीतून हवा काढून घेऊन त्या बंद करायच्या. इतक्या स्वस्त प्रकारच्या प्रक्रियासुद्धा आपल्याकडे होऊ शकत नाहीत कारण आपल्याकडे अशा प्रक्रिया करण्याची आणि साठवण्याची सोय आणि ऐपत शेतकऱ्यात येतच नाही; परंतु अशा तऱ्हेची सोय आणि ऐपत आपल्या शेतकऱ्याकडे जर असली तर 'ज्या वस्तूंचे कारखाने आपल्या देशात निघतात त्यांचा संदर्भ या देशातील गरजेशी नसून परदेशात कोणती यंत्रसामग्री मिळते, कोणत्या प्रकारचं तंत्रज्ञान लाभतं याच्याशी

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । ६५