पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/६५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 उदाहरणार्थ, मावळ तालुक्यात चाकण भागामध्ये मुख्ये पीक भुईमुगाचे आहे. ३ महिन्यांचं आणि ५ महिन्यांचं अशी भुईसुगाची दोन पिकं तिथं घेतली जातात. हे पीक निघतं तेव्हा गावातली सगळी माणसं जरी कामाला लागली तरी पुरत नाहीत. अशा वेळी अगदी शाळा बंद ठेवून मुलांनासुद्धा शेंगा उपटण्याच्या कामाला जावं लागतं आणि एकदा शेंगा उपटून झाल्या की जवळ जवळ सहा महिने गावामध्ये मजुरांना काम नसतं. भुईमुगाचा उत्पादनखर्च किलोला ४ रु. ३० पैसे असून गेल्या वर्षांपर्यंत किलोला फक्त २ रु.५० पैसे ते २ रु. ६० पैसे भाव मिळत आला आहे. जर का शेतकऱ्याला या शेंगाकरता उत्पादनखर्च भरून निघेल इतका भाव मिळाला असता तर आपण उत्पादन खर्चाच्या हिशेबात शेतीच्या किमतीवरील व्याज, इतर भांडवली गुंतवणुकीवरील व्याज, घसारा इत्यादी ज्या रकमा धरल्या त्या त्याच्यागाठी राखीव रकमा म्हणून जमा झाल्या असत्या. उदा. बैलाची किंमत १६०० रु.धरली आणि बैल ८ वर्षे काम करतो असं धरलं तर त्याची दर वर्षाला रु. २०० इतकी रक्कम बाजूला ठेवायला पाहिजे. रक्कम बाजूला ठेवायची म्हणजे 'बैलखाते' म्हणून पेटीत ठेवायची का? नाही. कारखान्यांच्या ताळेबंदामध्येसुद्धा अशाच रकमा राखीव ठेवल्या जातात. त्या जशा प्रत्यक्षात अन्य कुठे गुंतवल्या जातात त्याच पद्धतीने शेतकऱ्याला मिळालेली ही राखीव रक्क्म त्याला उद्योगधंद्याला लावता येईल. अशा तऱ्हेची गुंतवणूक करून भुईमुगाच्या शेतकऱ्याला किती प्रकारचे कारखाने काढता येतील? शेंगा तयार झाल्यावर त्या बाजारात नेण्याऐवजी लगेच वाळवून घेऊन त्यांची टरफलं काढून त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया करून तेलापासून ते अगदी खारेदाणे-गोडेदाणे, तेल, लोणी असे जवळ जवळ ऐंशी पदार्थ बनवता येतात. या ऐंशी उद्योगांपैकी तेलाची मोठी गिरणी उभी करणे शक्य नसले तरीसुद्धा लहान प्रमाणावर घाणी घालून, त्याला चांगल्या प्रकारचे दाणे पुरवून तेलाचा उद्योग सुरू करता येतो. जर दोन अडीच लाख रुपयांचं भांडवल असतं तर गावोगाव लहान प्रकारचे उद्योगधंदे उभे राहिले असते. त्यामुळे काय झाले असते? शेतकऱ्यावर कच्चा माल बाजारात न्यायची सक्ती न झाल्यामुळे त्याच्या मालाला आणखी चांगला भाव मिळला असता, म्हणजे शेतकऱ्याला त्याचा उत्पादन खर्च भरून मिळालाच असता, शिवाय कारखानदारीत जो काही फायदा आहे तोही मिळाला असता. हा झाला शेतीतून तयार झालेलं भांडवल आणि बचत इंडियात न पाठवता तिथंच ठेवण्याचा एक फायदा.

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । ६८