पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/६९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 प्रकरण : ७


 'भारता'तील वर्गविग्रह (?)


 भारत आणि इंडिया ही संकल्पना समजावून घेताना ग्रामीण भागात जी मंडळी राहतात आणि शेतीव्यवसायावरच आपला उदरनिर्वाह करतात ती सर्व सारखीच आहेत, एकाच पायावर आहेत हे गृहीत धरले पाहिजे. वस्तुतः ग्रामीण भागामध्ये शेती व्यवसाय करणारी मंडळीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारची आहेत. त्यात बडे बागायतदार आहेत, छोटे बागायतदार आहेत, मोठे शेतकरी आहेत, छोटे शेतकरी आहेत, अल्पभूधारक शेतमजूर आहेत तसेच भूमिहीन शेतमजूरही आहेत. या सगळ्यातला फरक लक्षात न घेता तुम्ही सर्व शेतकरी एक आहेत अशी जी मांडणी करता ती चूक आहे असा युक्तिवाद अनेक वेळा, विशेषतः डाव्या पक्षांकडून मांडला जातो. शेतकऱ्या-शेतकऱ्यांमध्ये फरक नाही अस म्हणत नाही. मोठे शेतकरी, लहान शेतकरी, अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतमजूर यांच्यामध्ये निश्चित फरक आहे. त्याचप्रमाणे टाटा-बिर्लांपासून त्यांच्या कारखान्यातून, उद्योगधंद्यांतून काम करणारे कामगार किंवा जुनियर अधिकारी वगैरे यांच्यात काही फरक नाही असंही म्हणण्यात काही अर्थ नाही. दोन्ही समाजात - 'भारतीय' आणि 'इंडियन' - वेगवेगळ्या पायऱ्या आहेत. आपण संघर्षासाठी जी रेषा ओढली आहे ती अशा ठिकाणी ओढली की जिथला फरक हा सगळ्यात महत्त्वाचा आहे; जिथं शोषणाची सगळ्यात मोठी यंत्रणा आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या वेळीसुद्धा आपण सगळ्या हिंदुस्थानला स्वातंत्र्य हवे असे म्हणत होतो. त्यावेळी केवळ राजकीय स्वातंत्र्य असं म्हणत नव्हतो. आम्हाला स्वराज्य आणि सुराज्य मिळायला पाहिजे या दोन्ही कल्पना होत्या. त्यावेळीसुद्धा या देशात श्रीमंत होते, गरीब होते, जातीचे भेद होते, धर्माचे भेद होते. त्यांचं महत्त्व आज कदाचित कमी झालं असेल. पण त्यावेळी हे

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । ७२