पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/७०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भेद असतानासुद्धा 'त्यावेळची शोषणाची मुख्य रेषा ही इंग्लंड आणि हिंदुस्थान यांच्यातील आहे.' या जाणिवेवरच ती चळवळ उभी राहिली. तो प्रश्न जोपर्यंत सुटत नव्हता तोपर्यंत देशातील बाकीचे अंतर्विरोध सोडविणे कठीण होते. त्याकाळीही समाजकारण आधी की राजकारण आधी असे वाद होऊन गेले, पण राजकारण आधी की अर्थकारण आधी असा मुद्दा जेव्हा उपस्थित झाला तेव्हा राजकीय प्रश्न - शोषणाची यंत्रणा संपल्याखेरीज अर्थकारणाला सुरुवात होऊच शकत नाही. सर्व जनता आपले अंतर्गत भेद विसरून स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाली, त्याच अर्थानं भारत आणि इंडिया यांच्यातला विरोध आज महत्त्वाचा तो सुटल्याखेरीज ग्रामीण भागातले आतले विरोध सुटू शकणार नाहीत. कारण ग्रामीण भागातील कमालीची दारिद्र्य हे तेथील कुणालाच त्याच्या श्रमाचा पुरेपूर मोबदला मिळत नसल्यामुळे आहे. मोठे शेतकरी, छोटे शेतकरी, अल्पभूधारक व भूमिहीन शेतमजूर हे मार्क्सच्या भाषेत वेगळे वेगळे वर्गच नाहीत. हे वेगळे वेगळे वर्ग धरले तर त्यांच्यामध्ये संघर्ष होणे अपरिहार्य आहे हे मान्यच करायला पाहिजे. पण मुळात हे वेगवेगळे वर्गच नाहीत. आज मोठा शेतकरी, ज्याच्याकडे २० एकर जमीन आहे तो आणि ज्याच्याकडे दोनच एकर जमीन राहिली आहे तो किंवा ज्याच्याकडील संपूर्ण शेती गेली आहे आणि जो केवळ शेतमजुरीवरच जगतो आहे किंवा शहरात रोजगार शोधण्यासाठी निघून गेला आहे तो या केवळ ग्रामीण दारिद्र्याच्या वाढत्या पायऱ्या आहेत. ज्या शेतकऱ्याची वीस एकर जमीन आहे आणि त्याचं उत्पन्नाचं तेच एकमेव साधन असेल तर शेतीमधून फायदा होत नसल्यामुळे तो आपल्या २० एकर जमिनीची ४० एकर करून आपल्या दोन मुलांना वीस वीस एकर जमीन देईल याची शक्यताच राहत नाही. म्हणजे मग २० एकरवाल्या शेतकऱ्याची दोन मुलं असली तर ती दहा एकरवाली होतात. त्यांची दोन-दोन मुलं पाच-पाच एकरवाली होतात. पुढील पिढी अगदी भूमिहीन - केवळ शेतमजूर बनते किंवा शहरात रोजगाराच्या शोधात जाते. प्रत्येकी दोन-दोन मुलांचंच गणित जरी आपण धरलं तरी चार पाच पिढ्यांत शेतकरी अधोगतीकडे जायला लागलेला दिसतो आणि याचं प्रत्यक्ष कारण म्हणजे कच्चा शेतीमालाला न मिळणारा भाव हे आहे. वर आपण जे गणित मांडलं त्यावरून कुणी या अधोगतीला कारण वाढती लोकसंख्या आहे असे म्हणेल, पण प्रत्यक्षामध्ये यात लोकसंख्येचा प्रश्न नाही. लोकसंख्येमुळे दारिद्र्य वाढतंय ही कल्पना चुकीची आहे. सध्याच्या गतीनं लोकसंख्या वाढता

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । ७३