पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/७६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लक्षात घेऊन मांडलेली आहे. तिथला विचार, तिथली वाक्य हिंदुस्थानातल्या परिस्थितीत लागू करणं हे अगदी चुकीचं आहे. ही निव्वळ पोथीनिष्ठ आहे, पुस्तकीपण आहे. समाजवाद्यांच्यासुद्धा एकामागोमाग ज्या काही बैठका झाल्या - (International) त्यातील तिसरी (Third International) या विषयावर जास्त महत्त्वाची आहे. प्रत्येक देशातल्या कम्युनिस्ट पुढाऱ्याने आपल्या देशातील शेतीची संस्कृती ही मार्क्सवादाशी कशी अपवादात्मक आहे ते सांगितले. शेतीची संघटना हा पहिल्यापासून मार्क्सवादाचा विषय नव्हताच. त्यामुळे रशियामध्ये प्रत्यक्ष कामगारांच्या चळवळीला यश येऊन त्यांच्या हाती राज्य आलं. तेव्हा मग त्यांच्यापुढे प्रश्न पडला की आता शेतीचं काय करायचं? आणि मग जे काही त्या वेळेला जमेलसं वाटलं ते त्यांनी केलं; परंतु त्याबद्दलची पोथीनिष्ठता बाळगणे चूक आहे.

 आणि ती जर बाळगायची असेल तर संपूर्ण पोथीनिष्ठता तरी बाळगावी. लेनिननं 'कुलक'ची व्याख्या कशी केली आहे? ज्याच्याकडे निदान २० एकर जमीन आहे तो कुलक. रशियामध्ये सतत थंडी आणि बर्फ असल्यामुळे तिथे बिगरपाण्याची जमीन अशी काही गोष्टच अस्तित्वात नाही. आपल्याकडे २० एकर बागायती जमीन असलेला शेतकरी म्हणजे कुलक हे मी मानायला तयार आहे. आहेत का आपल्याकडे असे शेतकरी? वस्तुतः आपल्याकडे असा काही मोठा शेतकऱ्यांचा वर्ग आहे ही कल्पनाच चूक आहे. बिहारमधल्या परिस्थितीविषयी मी बोलत नाही. मी आज महाराष्ट्रातल्या परिस्थितीविषयीच बोलतो आहे. आपल्याकडे असा काही मोठा शेतकऱ्यांचा वर्ग आहे ही कल्पनाच चूक आहे. बिहारमधल्या परिस्थितीविषयी बोलतो आहे. आपल्याकडे १८ एकर बागायती जमीन असलेल्या मोठा शेतकरी समजले जाते. त्याचा उल्लेख बरेच लोक आपल्या भाषणांतून टाटा-बिर्ला-बडा बागायतदार असा करतात. कुणी खोटी जमीन लपवली आहे, कुणी कुत्र्यामांजरांच्या नावावर जमिनी केलेल्या आहेत. अशी किती उदाहरणे आहेत? मला तरी तसं उदाहरण माहीत नाही. पण जर समजा वेगवेगळ्या भावांच्या नावांनी जमिनी वाटून दिल्या असतील तर त्यात काही अयोग्य आहे असे म्हणता येणार नाही. समजा सगळ्या भावांचा मिळून एक मोठा कारखाना आहे तर आपण त्या मालकीबद्दल काही हरकत घेत नाही. त्याप्रमाणे वेगवेगळ्या (भावांच्या कुटुंबीयांच्या) वाट्याची जमीन एकाच्याच नावाच्या खात्यावर असेल तर त्यावर आक्षेप असण्याचं काही कारण नाही. शहरात एखादा अधिकारी मनुष्य असतो. तो, त्याची बायको आणि

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । ७९