पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/८०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

फरकांविषयी वस्तुस्थिती लक्षात घेऊन ठरवले असणार अशी माझी कल्पना आहे. तसं शेतातल्या कामांमध्ये फरक करायचा झाला तर औताची कामे, खड्डे खणणे किंवा दगडाची कामे करणे अशा प्रकारची कामे करणारे पुरुष मजूर आणि खुरपणी, निंदणी किंवा पाणी देणे अशा प्रकारची कामे करणारे मजूर यांच्यातसुद्धा फरक करावाच लागेल आणि असाही फरक आपल्याकडे केला जातो. औताच्या मजुरांना, त्यातूनही पेरणी करणाऱ्या मजुरांना अधिक मजुरी दिली जाते.
 किमान वेतन कायद्यानं किमान वेतन कोणत्या पातळीवरचं ठरवून दिलं आहे? स्त्रियांच्या पातळीवरचं की पुरुषांच्या पातळीवरचं? स्त्रियांना विशेषतः ज्या प्रकारची कामं आपण देतो ती वेगळ्या प्रकारची असतात, त्या ते चांगलं करतात, बारकाईनं करतात असं धरायचं आणि त्यांचा मजुरीचा दर तोच आहे असं धरायचं. त्यामुळे आता होतंय त्यापेक्षा आपलं जास्त वाईट काही होणार नाही. आपण जर कायम पगारी नोकर ठेवू लागलो तर कारखान्यांत स्त्रियांना जशी बाळंतपणाची रजा द्यावी लागते तशी भरपगारी रजा द्यावी लागेल. मग केवढा भुईंड बसेल पाहा. पण एकदा कामगारांना कशा पद्धतीने वागवायचे याचे नियम ठरले तर त्यात आपण हरकत घेण्याचे कारण नाही. त्यामुळे आपल्याला जो काही खर्च येईल तो आपल्या उत्पादनाच्या किमतीतून भरून निघाला म्हणजे प्रश्न सुटला. आज मालक-मजूर संबंध कसे आहेत? शेतमाला रास्त भाव मिळाले तर शेतकरी शेतमजुराला त्याचा योग्य हिस्सा देईल या विचाराचं 'बीज' या संबंधात आहे काय? असा एक प्रश्न नेहमी विचारला जात असतो. इतकेच काय या प्रश्नाचे केंद्र करून काही राजकीय पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात सतत असलेले दिसतात.

 मी भाषणात नेहमी सांगत असतो की शेतमजूर आणि शेतमालक यांचे संबंध अजूनही घरोब्याचे आहेत आणि बहुतेक शेतमालक आणि शेतमजूर दुपारची भाकरी बांधावर एकत्र बसून खातात. त्यावर मी भाषणात एक वाक्य नेहमी वापरतो की 'शहरातली जी मंडळी आपल्या मोलकरणीला फुटक्या कानाच्या कपातून, जिन्याखाली जाऊन चहा प्यायला लावतात त्या मंडळींनी हा वाद वाढवू नये.' हे नुसतं भाषणापुरतं वाक्य नाही. त्याच्या मागे खोल विचार आहे. अशा प्रकारची वाक्यं किंवा वेगवेगळ्या अनुभवाच्या गोष्टी मी भाषणात मुद्दाम आणतो कारण हीच वाक्यं आणि गोष्टी उद्या गावोगाव प्रचाराची साधनं म्हणून फिरणार आहेत. आपण आधी ज्यांची चर्चा केली ती अर्थशास्त्रीय वाक्यं ही तितक्या प्रभावीपणे खेडेगावात फिरणार

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । ८३