पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/८१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नाहीत.
 मालक म्हणून नुसता बांधावर उभा राहणारा आणि मालक असून बायकोपोरांसह शेतमजुरांबरोबर शेतात राबणारा अशा प्रकारचे शेतकरी किती किती प्रमाणात आहेत? याचा नीट अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येईल की निदान ९५% शेतकरी हा आपल्या कुटुंबासह मजुरांबरोबर शेतात राबत असतो. परिस्थिती आणि स्थळकालानुरूप या प्रमाणात फरक झाला तरी हे प्रमाण फारसं कमी असणार नाही. हा जो शेतकरी आहे त्याचे शेत मजुरांबरोबर शेतात राबत असतो. परिस्थिती आणि स्थळकालानुरूप या प्रमाणात फरक झाला तरी हे प्रमाण फारसं कमी असणार नाही. हा जो शेतकरी आहे त्याचे शेतमजुरांबरोबरचे संबंध घरोब्याचे आहेत. अजिबात काम न करता बांधावर उभा राहणारा शेतकरी अल्प प्रमाणात आहे. मी, उदाहरणार्थ त्या प्रकारचा शेतकरी आहे. मी फक्त प्रयोग करण्याकरता शिकून घेण्याइतपतच शेतीत काम केले आहे. पण मग त्यामागील अर्थशास्त्र विचारात घेता मी ही कामं आता करीत नाही. मालक-मजूर यांच्यातील संबंध हे शेवटी त्या त्या माणसांवर लहानपणापासून झालेल्या संस्कारांमुळे त्यांचा जो स्वभाव बनलेला असतो त्यावर अवलंबून असेल असं नुसतं म्हणून सोडून देऊन चालणार नाही.

 आपण अर्थशास्त्रीय विचार करताना पहिल्यांदा एक गोष्ट गृहीत धरायची आहे की प्रत्येक गोष्टीचं कारण हे आर्थिक असतं. अर्थकारणानं स्वभाव ठरतात, स्वभावानं अर्थकारण ठरत नाही. अगदी पुण्यामध्ये ब्राह्मण घरात जन्मलेले आणि लहानपणी स्नानसंध्या केलेले लोक अमेरिकेत गेल्यावर पहिल्याच आठवड्यात गोमांस भक्षण कसे करू लागतात हे मी पाहिलेलं आहे. ज्यांच्या आयुष्यात कधीही काही विशेष घडलेलं नाही तेही कसे बदलतात हेही पाहिलेलं आहे. याला कारण त्यांचं अर्थकारण बदललेलं असतं तेव्हा स्वभाव जो आहे तो अर्थकारण बदलल्याने बदलतो, स्वभावाने अर्थकारण बदलत नाही. अमुक एका माणसाचा स्वभाव असा का आहे हे समजून घ्यायचे असेल तर त्याचा स्वभाव तसा असण्याने/नसण्याने त्याचा फायदा/तोटा काय आहे हे समजून घ्यावे लागेल. एक काळी ब्राह्मणांनी किंवा उच्चवर्णियांनी हरिजनांना जे तुच्छतेनं वागवलं त्याचं कारण म्हणजे तसं वागवण्यात उच्चवर्णियांचा आर्थिक फायदा होता. मी तर असं म्हणेन की ४७ नंतर जातीयता जाणार म्हणत जे कायदे झाले तेसुद्धा उच्चवर्णियांच्या हितासाठीच झाले. जर पूर्वीचीच जातीव्यवस्था चालू ठेवली असती तर ब्राह्मण किंवा क्षत्रियांना बुटाचे कारखाने काढायची परवानगी

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । ८४