पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/८२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मिळालीच नसती, युनिव्हर्सिटीमध्ये मेटलर्जीच्या कोर्सला फक्त लोहार-तांबटांच्याच मुलांना प्रवेश मिळाला असता आणि आज असे जे अनेक उद्योगधंदे चालू झाले आहेत ते ज्या जातींना आम्ही आजपर्यंत हीन समजत आलो आहोत त्या जातीच्याच लोकांना करता आलो असते आणि आमच्याकडे फक्त मास्तरकी राहिली असती. म्हणूनच हा जातीयवाद दूर झाला. माझे एक मित्र म्हणतात की, 'स्वातंत्र्यानंतर हरिजनांच्या पुढाऱ्यांनी म्हणायला पाहिजे होतं की हा जातीयवाद यापुढही चालूच राहिला पाहिजे.' हा वाद नष्टही होईल. पण केव्हा? जेव्हा ग्रामीण भागाच्या विकासाला सुरुवात होईल तेव्हा. तुम्ही जोपर्यंत ग्रामीण भागात राहता आहात, हरिजनांची वस्ती वेगळी आहे, दोघांना मिळून पुरेशी एक भाकरी मिळत नाही तोपर्यंत दुसरा काही उद्योगधंदा नाही म्हणून हा वाद चालूच राहणार आहे. कोणत्याही समाजाची विकासाची गती खुंटली की त्याची आपापसातली भांडणं चालू होतात. समाजाला एकाच ठिकाणी राहायलासुद्धा धावावं लागतं. स्वातंत्र्याच्या आधी तामिळनाडू राज्यात हिंदीच्या प्रसाराची गती सगळ्यात जास्त होती. स्वातंत्र्यानंतर जेव्हा सगळी गती खुंटली तेव्हा राष्ट्रभाषा म्हणून हिंदीला सगळ्यात मोठा विरोध तामिळनाडूतच सुरू झाला. स्वातंत्र्यापूर्वी सगळीकडे राष्ट्रीय बंधुभाव होता. पण पुढे मुंबईत शिवसेनेसारखी प्रांतीय वृत्तीची चळवळ चालू झाली. अनेक ठिकाणी अशा संकुचित वृत्तीच्या चळवळी सुरू झाल्या. याचं मुख्य कारण देश पुढं जायचा थांबला. जो थांबला तो संपला. थांबल्यामुळे आपल्या जुन्या वृत्ती पुन्हा उफाळून वर आल्या आणि म्हणून अर्थकारणाला हात घातल्याशिवाय समाजकारण-समाजप्रबोधन पुरेसं ठरू शकत नाही. तुम्ही समाजातल्या सगळ्यांची गती पुढे जाणार अशी करा, हे बारीकसारीक फरक आपोआपच नाहीसे होतील. याच्यातला महत्त्वाचा मुद्दा एवढाच की स्वभावानं काही अर्थकारण ठरत नाही, उलट अर्थकारणानं स्वभाव ठरतो.

 आपण या विषयाकडे पुस्तकांच्या चौकटीतून पाहता कामा नये. चांगले संबंध म्हणजे लाचारीचे संबंध नव्हते. आमचं त्याचं काही भांडण नाही, हा येतो आणि आम्हाला सलाम करतो, कोपऱ्यात बिनतक्रार बसतो याला काही 'चांगले संबंध' म्हणत नाहीत. आपण आपल्या डोक्यात पुस्तकांची तयार केलेली चित्रं बाजूला ठेवून प्रत्यक्षात शेतावर मजुरांच्या बरोबर काम करणारी माणसं किती आहेत हे पाहिलं पाहिजे. पुस्तकांच्या मर्यादेत अडकलं की बऱ्याचशा दिसणाऱ्या गोष्टी कलुषित दिसतात. मी जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा माझासुद्धा शेतकऱ्यांवर

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । ८५