पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/८३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हाच राग होता. त्यावेळी तिथे जे प्रांतऑफिसर होते त्यांच्याकडून भूमिहीनांना जमिनी मिळवून पहिली सामुदायिक शेती करण्याच्या विचारात होतो. म्हणजे माझ्याशी डोक्यात पुस्तकातले जे विचार आहेत ते सुरुवातीला होते. पण शेती करायला लागल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की, पुस्तकांतून उभं केलेलं परिस्थितीचं चित्र आणि प्रत्यक्षातील परिस्थिती यात निदान आमच्या भागात तरी फार वेगळेपणा आहे. आमच्या भागात एक आश्चर्यकारक गोष्ट सापडली की ज्याला भूमिहीन म्हटलं जाईल अस एकही उदाहरण सापडलं नाही. धुळे भागातसुद्धा भूमिहीनांचं प्रमाण नगण्य आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती बदलू शकते. आमच्या गावांमध्ये आम्ही केलेल्या शिरगणतीत जेव्हा एकसुद्धा भूमिहीन मजूर नाही असं दिसलं तेव्हा माझ्या मनावर त्याचा परिणाम झाला आणि मी पुस्तकी चौकटीतून बाहेर आलो. आता आपण केवळ बांधावर राहणारा शेतमालक किती आणि मजुराच्या बरोबरीने काम करणारा शेतमालक किती याचा नीट विचार केला पाहिजे. म्हणजे मग आपण ज्या मालकाविषयी बोलतो आहोत त्याचा नेमका गुणधर्म काय आहे हे लक्षात येईल. नाहीतर आपण बोलायचं 'दो बिघा जमीन' सिनेमामधील जमीनदार लक्षात ठेवून आणि बोलत असायचं एखाद्या पागोटेवाल्याबद्दल, असं होता कामा नये.
 एखाद्या भागातील कार्यकर्ते जर शेतकरी आंदोलनाचे समर्थन आणि शेतमजुरांना किमान वेतनाची मागणी या दोन्ही गोष्टी करत असतील - एकाच वेळी करत असतील तर ती चांगली गोष्ट आहे. पण आपलं शेतकरी आंदोलन उभं राहिल्यानंतर काही पक्ष्यांच्या मंडळींनी सगळीकडे शेतमजुरांचे आंदोलन उभे करण्याचे आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. आपण त्यांच्या नादी लागता कामा नये. कारण त्यांना अशा तऱ्हेने शेतमजुरांचे आंदोलन उभे करून शेतकरी-शेतमजूर हा वाद जागता ठेवून आपलं शेतकरी आंदोलन पाडायचं आहे.

 'मालकमजूर संबंध अगदी विकोपाला गेले आहेत' असे म्हणणारी मंडळी कोणत्या प्रकारच्या वर्गात मोडतात हे पाहूनच या गोष्टीतील सत्यता समजावून घेतली पाहिजे. दुर्दैवाने एक गोष्ट खरी आहे की आपण कितीही बोलत असलो की शेतमालक आणि शेतमजूर एक आहेत आणि एकत्र राहायला पाहिजेत तरी आज ज्या प्रमाणात शेतमजूर आपल्या चळवळीत आणता यायला पाहिजेत त्या प्रमाणात आणता आलेले नाहीत. अर्थात असं भासण्याचं दुसरंही एक कारण आहे. महाराष्ट्रातल्या

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । ८६