पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/८४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कुठल्याही जिल्ह्यामध्ये ज्याला भूमिहीन म्हणता येईल असा शेतमजूर धुळे जिल्हा सोडला तर फारसा सापडत नाही. बाकीचा जो अल्पभूधारक शेतमजूर आहे तो आपल्यामध्ये सामील होतो. पण सांगतो, 'मी शेतकरी आहे.' ५ ते १० टक्के भूमिहीन सोडले तर बाकीची मंडळी आपल्या अडीच एकरात काम करून शेजाऱ्याकडे मजुरीवर जातात. मागासवर्गीय जे आहेत ते बहुसंख्य भूमिहीन आहेत. त्यांच्यात जास्तीत जास्त एक टक्का हे शेतकरी आहेत. ही भूमिहीनांची संख्या मुखतः पूर्वी वाड्यातले जे वतनदार होते त्यांची आहे. बलुतेदारीची पद्धत गेल्यामुळे वतनाच्या जमिनी परत कराव्या लागल्या, त्यामुळे सगळे बलुतेदार भूमिहीन झाले.
 आपल्या राज्यातील शेतकऱ्याची जमीनधारणाच इतकी कमी आहे की जवळ जवळ ९५ टक्के शेतकरी आपल्या कुटुंबीयांसहित शेतमजुराबरोबर राबत असतो. एका घरात एक कारभारी असतो. तो सोडून सगळेच शेतात कामं करतात. शेतीचं खातं एकाच्या नावानं असलं तरी घरातला दुसरा एखादा चलाख माणूस कारभारी असतो. त्याची बायको-मुलं जर शेतात काम करत असली तर तो शेतात काम करतो असंच धरलं पाहिजे. माझ्या शेतासंबंधी बाहेरची कामं, प्रयोगाकरता वेगवेगळ्या वस्तू तयार करून घेणं, त्या आणणं या कामातच मी अडकलेला असतो. माझ्या घरातीलही कुणी शेतीत काम करीत नाही. म्हणजे मी बांधावरचा शेतकरी आहे असं म्हणायला हवं. अशा शेतकऱ्यांचं एकूण प्रमाण किती?

 गावामध्ये 'बागायती पिकं घेणारा' असा एक शेतकरी वर्ग वाढू लागला आहे. तो जास्तीत जास्त 'बांधावरचा' आहे असे दिसत असले तरी बागायती पिकं घेणारा शेतकरी हा स्वतः जास्त काम करतो. त्याला सतत २४ तास देखरेख करावी लागते. विशेषतः भाजीपाला करणारी मंडळी बांधावर बसून का होईना, काळजीनं अहोरात्र पाहणी करीत असतात. पानाला मागून कुठे कीड लागते काय, रोपाची वाढ होते की नाही, टोमॅटोचे पीक असेल तर झाडाला दोनच फांद्या राहिल्यात की तीन, एका फांदीला किती फळं राहातात, कलिंगडं काढली तर एका वेलाला दोनच फळ राहतात की नाही अशा अनेक गोष्टीची पाहणी करून उपाययोजना करणे याचं शास्त्र इतकं प्रचंड झालं आहे की वरील सर्व पाहणी करणे हे एक कामच आहे. हे काम करणारा मजुरी करत नाही असं धरणं चूक आहे. ज्वारी, भात यांच्या पिकातसुद्धा अशी कामे असतातच. कुठे चिकट्या पडलाय का, कीड लागलीय का हे लक्षपूर्वक पाहावंच लागतं. तेव्हा बांधावर राहून पाहणी करणं हेसुद्धा कामातच

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । ८७