पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/८७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 प्रकरण :८
 इंडियाचं भारताच्या शोषणाविषयीचं पंचशील


 शेतीमालाला भाव मिळाल्याशिवाय ग्रामीण भागातील वेगवेगळे विरोध दूर होणार नाहीत असे असताना शेतीमालाच्या भावाचा प्रश्न न हाताळता शेतकरीशेतमजूर किंवा छोटे शेतकरी-मोठे शेतकरी असे वाद उपस्थित का केले जातात? अशा प्रकारचे वाद निर्माण करणे हा इंडियाचा भारताच्या शोषणविषयक पंचशीलाचा एक भाग आहे.
 आपण आपल्या देशाचा इतर देशांशी संबंध ठेवताना जी तत्त्वं पाळतो त्यातील 'पंचशीला'चा फार उदो उदो झाला आहे. इंडिया भारताचं जे शोषण करतं त्यांचीसुद्धा पाच तत्वे आहेत.
 शेतीमालाला भाव न देणे हे त्यातलं पहिलं तत्त्व आपण पुष्कळ तपशिलाने समाजावून घेतलं आहे. शेतकऱ्याचं शोषण करायचं आणि त्यातून उद्योगधंद्यांकरिता भांडवल उभं करायचं असं हे पहिलं तत्त्व आहे.

 दुसरं तत्त्व म्हणजे शेतीमालाला भाव मिळत नाही म्हणून शेतकरी चिडून उठू नये यासाठी त्याचं मन अन्य कुठेतरी गुंतवणे. शेतीमालाचं शोषण तर आपण करतो आहोत. पण हे असं कठोरपणे चालू राहिलं तर अगदी झोपी गेलेला शेतकरी जागा होईल आणि ही पद्धत तो बंद पाडून टाकतील.म्हणून शेतकऱ्याला थोडं फार सहन करता आलं पाहिजे, त्याच्या मनासमोर काही तरी आशा टिकून राहिली पाहिजे, तो अगदीच निराश होता कामा नये यासाठी त्याला दूध तर द्यायचं नाही पण निदान खुळखुळा तरी वाजवित राहायचं अशा धोरणाने त्याच्यासाठी म्हणून योजना आखायच्या हे या तत्त्वाचं मुख्य अंग आहे. पंचवार्षिक योजनामधून ज्या

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । ९०