पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/९०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

किंवा सायकलवरून जायचे, माल बघायचे. मग भाव पटला तर शेतकरी माल देई नाहीतर अधिक भावाची वाट पाहत कांदा घरातच ठेवून देई. चाकण भागातला कांदा साधारणपणे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या तीन महिन्यांत विक्रीला येतो. नेमका याच काळात वळीवाचा पाऊस पडतो. दुपारी ऊन खूप तापतं आणि संध्याकाळी पाऊस पडतो असं बऱ्याच वेळा घडतं. बाजार समितीत कांदा नेऊन टाकला की तो खपायला जितका वेळ लागेल तितका वेळ शेतकरी सारखा वर उन्हाकडे बघतो आणि ढगाकडे बघतो. कारण दुपारी कांदा उन्हात तापला आणि त्यावर संध्याकाळी जर पाऊस पडला तर त्या कांद्याचा चिखल होतो. समितीच्या, बाजारात त्याला काही संरक्षण होतं. समजा या व्यापाऱ्याचा भाव पटला नाही तर दुसरा येईपर्यंत कांदा काही खराब होत नसे. बाजार समित्यांच्या निर्मितीमागील उद्देशसुद्धा जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांसारखंच आहे. बाजार समिती झाली म्हणजे समितीच्या पातळीवर १०/१२ माणसं मतांचे गठ्ठे आणणारी तयार होतात. असं हे पंचशीलातलं दुसरं तत्त्व आहे की भाव मिळाला नाही म्हणून शेतकऱ्यानं चिडून उठू नये, त्याचं कुठतरी मन रमवावं, त्याला खोट्या आशेवर झुलवत ठेवावं अशासाठी फसव्या विकास योजना तयार करणे.
 तिसरं तत्त्व अतिशय महत्त्वाचं आहे. इंग्रजांनी राज्य करताना 'फोडा व झोडा' अशी नीती वापरली. कुठे हिंदूमुसलमानांत वाद लावा तर कुठे छोटे मोठे असे वाद लावा म्हणजे सगळी मंडळी एकमेकात भांडत राहतील आणि ही सगळी जणं मिळून उठून स्वातंत्र्य मागायला यायची नाहीत. त्याचप्रमाणे छोटे शेतकरी- मोठे शेतकरी, शेतकरी-शेतमजूर, बागायती-जिराईती असे वादविवाद लावण्यातील मुख्य हेतू हाच की शेतकरी आपापसात भांडत राहिले पाहिजेत. त्यांनी एक होऊन आपलं जे शोषण चाललं आहे ते थांबवा अशी मागणी करू नये.
 या पंचशीलातलं चौथं तत्त्व म्हणजे शेतकऱ्यांविरुद्ध मोठ्या प्रमाणावर प्रचार करणे हे आहे. हा प्रचारसुद्धा किती हुशारीनं करतात!

 सगळ्या मराठी चित्रपटांमध्ये ग्रामीण परिस्थितीचे जे वर्णन केलं जातं, जे चित्रण केलं जातं ते आणि ग्रामीण भागाची आपण जी परिस्थिती प्रत्यक्षात पाहतो, पूर्वीच्या काळी वाडे बांधलेले असतील तर त्याच्या भिंती आता पडलेल्या आहेत. त्या सारवून घेण्याचीसुद्धा शेतकऱ्यात कुवत नाही. बाकी सर्व कुडांच्या झोपड्या. सिनेमातलं खेड असं नसतं. त्यातील वाडे मजबूत बांधलेले असतात, पाटलाच्या

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । ९३