पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/९२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आलं आहे की, जे कुणी शेतकरी आंदोलन उभं करतात असं दिसतं अशा शेतकरी कार्यकर्त्यांना पोलिसांनी निवडून काढलं आणि त्यांना गोळ्या घातल्या.
 आज आपली आंदोलनं करताना आपण जी सावधगिरीची पावलं टाकतो, अतिरेक होऊ नये याची काळजी घेतो त्याच कारण ही दडपशाही आहे. ही दडपशाही पाहिल्यानंतर आपली गाडी दोन चार दिवस थांबवून थंड झाली तरी चालेल असा विचार केला पाहिजे. कारण आज नव्यानं उभा राहणारा शेतकरी अशा प्रकारच्या दडपशाहीपुढे आपल्या अपुऱ्या शक्तिनिशी अधिक काळ तग धरू शकणार नाही.

 आपल्या शेतकरी संघटनेच्या आंदोलनांच्या वेळचा आपला अनुभव काय आहे? शहरात कामगारांचा लढा चालू झाला, संप चालू झाला म्हणजे काही वेळा त्याच्यामध्ये दगडफेकही होते, कुठे गाड्या पेटवण्याचे प्रकार होतात. संप करणे, दगडफेक, जाळपोळ अशा कारणाखाली त्यांच्यावर खटले भरण्यास सुरुवात होते. पण संप मिटला की सर्वसाधारणपणे अनुभव असा येतो की खटले वगैरे काढून टाकले जातात किंवा काही काढले नाही तर फारसे जोमाने चालवले जात नाहीत. पण आमचं चाकणचं कांदा- आंदोलन होऊन, यशस्वी होऊन आज वर्ष होऊन गेलं तरी खटले मागे घ्यायचं तर बाजूलाच राहिलं पण अजूनही पोलिस वेगवेगळ्या भागात जाऊन एकेका माणसाला शोधून त्यांच्यावर नवनवीन खटले भरत आहेत. नाशिकच्या कांदा- उस आंदोलनात सत्याग्रही शांतपणे रेल्वे रूळांवर बसले होते. तेव्हा त्यांना आमच्या अशा सूचना होत्या की प्रत्येकानं छातीवर हाताची घडी घालून बसायचं. काही झालं (अगदी गोळीबार झाला तरी) कुणी हाताची घडी काढायची नाही. (गोळी लागली तर तसेच हात असलेला मुडदा मिळाला पाहिजे.) अशा तऱ्हेने शांतपणे रूळांवर बसलेल्या माणसांना पोलिस अधिकाऱ्यानं म्हटलं, 'तुम्हाला तुमच्या नेत्यानं काय सांगितलं आहे? हात बांधून बसा, ना? मग बसा बघू हात बांधून. आता शांत बसा आणि मी काय सांगतो ते ऐका.' असं म्हणून त्यानं सांगितलं, 'आम्हाला रेल्वेगाडी चालू करायची आहे, तुम्ही इथून ताबडतोब निघा. तेव्हा सत्याग्रहींनी शांतपणे पण ठामपणे सांगितलं, 'आम्हाला आमच्या नेत्यांनी सांगितल्याशिवाय आम्ही येथून उठणार नाही.' त्यांनी तीन वेळा असं सांगितलं आणि मग लगेच पोलिसांनी लाठीहल्ला आणि गोळीबार सुरू केला. खरं तर एखादा जमाव दंगेखोर असतो, प्रक्षुब्ध होतो, नासधूस करतो तेव्हाच गोळीबार

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । ९५