पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/190

हे पान प्रमाणित केलेले आहे.

राजकारणाविषयी, शेतकरी संघटनेचे धोरण असे येरेगबाळे नाही. १९८२ सालच्या सटाणा अधिवेशनाच्या ठरावात अगदी स्पष्ट म्हटले आहे! निवडणुकीचा उपयोग आंदोलन प्रभावी करण्याकरिता आहे. देशभरच्या आजच्या स्थितीत शेतकऱ्याचे, श्रमिकांचे, दलितांचे आणि शोषितांचे आंदोलन मोठ्या कठीण अवस्थेतून जात आहे. मोठी जिवघेणी संकटे या आंदोलनापुढे 'आ'वासून उभी आहेत. या संकटांचा बीमोड करण्यासाठी नांदेडच्या पोटनिवडणुकीचा उपयोग करण्याचे आम्ही ठरविले आहे.

 आज दुपारी येथे आल्या आल्या काही पत्रकारांनी मला विचारले, 'तुम्ही नांदेड निवडणुकीत लक्ष का घातले? शंकरराव चव्हाणांचं आणि तुमचं भांडण आहे म्हणून तुम्ही या निवडणुकीत हात घालत आहात का?' या प्रश्नाचे उत्तर उघड आहे. इतका आमचा हेतू कोता नाही. पूर्वी काहीही झालेले असो, शंकरराव चव्हाण आणि शेतकरी संघटना यांचे सध्या संबंध खरोखरच चांगले आहेत. मुंबईच्या ठिय्या कार्यक्रमाच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी एक मंत्री पाठवून आम्हाला चर्चेसाठी बोलावून नेले. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली, समझोता झाला. शेतकरी संघटनेच्या मागण्यांसंबंधी राज्यशासन व शेतकरी संघटना यांनी दोघांनी मिळून केंद्र सरकारकडे संयुक्तपणे प्रयत्न करण्याचे ठरले. त्याप्रमाणे दिल्लीत बोलणी चालू झाली. कापूस एकाधिकार खरेदीच्या विक्रीव्यवस्थेवर देखरेख करण्यासाठी शेतकरी संघटनेच्या दोन प्रतिनिधींची नेमणूक झाली. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर प्रत्यक्ष हिंसाचाराचा आरोप नसेल तेथे खटले मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. एवढेच नव्हे तर यापुढे शासन आणि संघटना यामध्ये सर्व पातळीवर स्थायी संबंध तयार व्हावेत या कल्पनेलाही मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिला आहे. असे संबंध तयार झाले तर छोट्या छोट्या प्रश्नावर आंदोलने करण्याची आवश्यकताच राहणार नाही. थोडक्यात शंकररावांवरील रागामुळे संघटना नांदेडच्या निवडणुकीत उतरत आहे हे म्हणणे चूक आहे. उलट संघटना या निवडणुकीपासून दूर राहिली असती तर महाराष्ट्र राज्याच्या पातळीवर संघटनेचा फायदाच होऊ शकला असता.

 यात वैयक्तिक रागलोभाचाही प्रश्न नाही. शंकरराव चव्हाणांनी यापूर्वी व्यक्तिश: अनेक दोषारोप केले हे खरे आहे; पण प्रत्यक्ष एक-दोनदा भेट झाल्या नंतर, 'आमची भेट यापूर्वीच व्हायला पाहिजे होती, म्हणजे सर्व गैरसमज टळले असते. शरद जोशींचा कापूस प्रश्नाविषयी अभ्यास सखोल आहे,' असे उद्गारही त्यांनी खुल्या परिषदेत अगदी मोकळेपणाने काढले. सार्वजनिक आयुष्यात एवढा प्रामाणिकपणा फार दुर्मीळ आणि त्याबद्दल शंकररावजींबद्दल मला आदर वाटतो.

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / १८१