पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/93

हे पान प्रमाणित केलेले आहे.

चुकीच्या व्युत्पत्त्यांबद्दल आणि तर्कहीनतेबद्दल टीकेची झोड उठवली होती. स्वत: जोतीबांना 'गुलामगिरी' ग्रंथातील त्यांच्या या दोषांबद्दल जाणीव नव्हती असे नाही. ब्राह्मणांच्या ग्रंथांनी आजपर्यंत सांगितलेला इतिहास समाजाच्या मानेवर ओझे होऊन बसला होता. हे ओझे उतरविणे हा जोतीबांचा उद्देश होता. जुना इतिहास मोडायचा म्हणजे त्याला पर्यायी इतिहासाची बांधणी आवश्यक आहे. मत्स्य, कूर्म, वराहांच्या कथा मोडून काढण्यासाठी कोणत्या उत्खननातील किंवा कोणत्या ग्रंथातील पुराव्यांचा उपयोग होणार आहे? जोतीबांनी केलेल्या इतिहासाच्या नव्या मांडणीला पुराव्यांचा पक्का आधार नसेल; पण मुळातल्या धर्मग्रंथातील मांडणीला असा कोणता भरभक्कम आधार होता?

 भटांच्या धर्मग्रंथाइतक्या निराधार खल्लड धर्मग्रंथांना उधळून लावण्यासाठी बारकाव्याने साधनांची मांडणी करणे म्हणजे त्या ग्रंथांना वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देणे झाले असते.

 दशावतारांमधील अवतारांवर जोतीबांनी केलेल्या सर्व टीकेच्या प्रपंचात एक मोठे सत्य तेवत आहे. इतिहास हा जेत्यांनी लिहिलेला असतो. ब्राह्मण समाजाने इतर समाजांवर वर्चस्व मिळविले आणि त्यांनी केलेल्या ग्रंथांत त्यांना सोईस्कर अशी मांडणी केली. पराभूत समाजांची बाजू कोठे मांडली गेली नाही.

 स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १८५७ सालच्या संग्रामाचा इतिहास लिहिला. हे बंड नव्हते, स्वातंत्र्ययुद्ध होते ही मांडणी करण्याकरिता स्वातंत्र्यवीरांना थोडाफार तरी पुरावा गोळा करता आला. तेवढ्याच आधाराने त्यांनी एक स्वतंत्र इतिहास लिहिला. 'मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह' चा इतिहास तासून पाहणार कसा? त्यातील हास्यास्पद गोष्टींची हेटाळणी करणे यापलीकडे कोणालाही काही जास्त करण्यासारखे नव्हते. याउलट, बळीराजाचा इतिहास जोतीबांनी प्रभावीपणे उभा केला. बळीराजा हा थोर राजा होता, उदार होता. वामनाने केलेला त्याचा वध अन्याय्य होता. या बाबतीत तर अगदी ब्राह्मणग्रंथातसुद्धा पुष्टी मिळते. उदाहरणार्थ,

 बहुधा बळीद्वार क्षणभरीहि सोडितां नये देवा

 न चुकावी छल.. पाप.. प्रायश्चित्तार्थ साधुची सेवा

(संशय रत्नमाला, आर्या क्र. ६)

 शेतकऱ्याच्या घरच्या आयाबहिणी आजही "इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो" अशी प्रार्थना करतात, यामागे एक दडपलेला इतिहास आहे. जोतीबांनी शोषित आणि पराभूत समाजाचा पर्यायी इतिहास कसा असू शकेल याची थोडीशी झलक दाखविली, एवढेच.

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / ८८