पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/३८

हे पान प्रमाणित केलेले आहे.

डोक्यावर, कमरेवर पाण्याच्या घागरी घेऊन येतांना दिसल्या. प्रकाश त्यांना काही विचारणार इतक्यात श्रीनाथने त्याला गप्प राहण्याची खूण केली.
 "पक्या, आपणच पुढ होऊन बघूया पाणी कुठून आणतात ते." असं म्हणत ते चालायला लागले. अवघ्या दहा मिनीटात ते एका खोल दरीपाशी येऊन उभे राहिले. डोंगराच्या उतारावरून चिंचोळी पायवाट खाली उतरत होती. खोल पायरी सारखे दगड नीट रचून ठेवलेले. एकेक पायरी उतरून मध्यात यायचे. तिथे मात्र जरा मोकळी जागा होती. दोन मोठया धोंडयावर चपटे दगड टाकून टेका तयार केला होता. घळीतून उतरून गेले की निळाई नदी. उतरण्यासाठी समोर प्रचंड रूंद असा वाळूचा पट्टा. नदीची खूण सांगणारा. त्या पात्रातही काही बाया दिसल्या. डोक्यावरून, अंगभर पदर घेऊन साड्या कसून बांधलेल्या. पात्रात खड्डे खणलेले. ते आदल्या दिवशी सांजच्याला करून ठेवायचे नि सकाळी त्यात साठलेले नितळ झालेले पाणी घागरीत भरायचे. बारकी पोरं मग नारळाची करवंटी किंवा लहान वाटीतून घागरीत पाणी भरत होती.
 "ओऽऽ भाऊ, येक तर वरी तरी चढून जावा, नायतर खाली उतरा. आमचा रस्ता मोकळा करा." एक प्रौढ बाई अंगावर मऊपणे खेकसली. दोही पटकन खाली उतरून आले.
 दोन्ही बाजूंनी बुटक्या डोंगराच्या रांगा. बोडक्या डोक्यांसारखे दिसणारे भकास पिवळे डोंगर व तुळतुळीत दगडांची टेंगळं. मधून लांबच लांब वाळूचा पट्टा. त्या वाळूच्या पट्याची रूंदी चांगली चौडी आहे. फार वर्षापूर्वी निळाईचे पात्र मोठे असावे. श्रीभैय्या, प्रकाशने वर चढायला सुरुवात केली. चढतांना दमछाक झाली. मनात आलं, गावातील बाया कशा आणित असतील खेपेला दोन-दोन घागरी भरून? आणि मध्यावर चापट दगड, मोठ्या दोन दगडांवर ठेवून जो ठेपा केला होता, त्याची महतीही लक्षात आली. तिथे घागर टेकायची. क्षणभर दम घ्यायचा आणि परत चढण चढायची. गरज आणि अडचणी माणसाला शहाणं करतात हे खरं.
 पारावर आता एक लंगडा माणूस येऊन बसलेला दिसला. त्याला पाहून दोघांनी रामराम घातला.
 "बाबा, गावात माणसं दिसत न्हाईत. किती वस्तीचं गाव हाय? बायाच दिसतात काम करताना." श्रीनाथने विचारले.

 "व्हय, व्हय कस्सं. तुज्या कापडांवरून सरकारी मानुस दिसत न्हाईस. मंग तुज्यापाशी बोलून काय उपेग? कस्सं? सरकारी असतास तर आमचं गऱ्हाणं तिकडं जाऊन गायलं असतंस, कस्सं?" त्या लंगड्या म्हाताऱ्याने उत्तर दिले.


शोध अकराव्या दिशेचा / ३८