पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/४८

हे पान प्रमाणित केलेले आहे.

कोणीच बोलेना. जो तो उठून मुकाट झोपडीकडे गेला.
 अंकुशच्या हातात दोन उशा आणि चादरी देत आंज्याने गोविंददादांना हटकले, "दादा तुमची समदी चर्चा राजकारणाची. गावाकडचं सांगानं काही. आमचे काका कसे हायीत. शिवादादाची थोरली कारभारीन कशी हाय. त्यांचं मोठं पोरगं आंब्याच्या योगेसरी शाळत घातलं म्हणं. भोसल्याची गया मावशी गडदेमामाची राणूमाय…सगळ्यांची लई आठवन येती हो…"
 "हाईत समदी बरी… आंज्ये एकांदी चक्कर करा दिवाळीच्या टाईमाला. परत्यक्ष भेटा. लई झोप याला लागली. घे लावून दार." असं म्हणत त्यांनी रस्ता पार केला.
 दादरच्या बंगल्यातल्या नोकरीची चांगली बातमी सोनूच्या पप्पांना सांगणार कधी? उद्या सकाळी सांगू असं मनाशी म्हणत आंजाने दोन चटया बाहेर दिल्या आणि ती आडवी झाली.
 .... निळाईतून एक घागर नि एक बारकी बिंदगी पाणी आणताना तिची दमछाक होई. चार खेपात ती पार गळून जाई. तरी अंकुशा माणुसकीचा नवरा. चढाव चढून आली की तो बाकीचा रस्ता काटून पाणी घरात नेऊन टाकी. यंदाही पाऊस नेटका झाला नाही. भेगाळलेलं उजाड, चारदोन बाभळीची झाडं उभी असलेलं त्याचं शेत,... रान डोळ्यासमोर आलं. जिमीन किती तहानली असंल. तिच्या अंगावरून गेल्या दोन बरसांत कुणाचा हात फिरला असेल…? विचार करता करता केव्हा तरी आंजाचा डोळा लागला.
 'आंजे मी आज कामावर जाणार न्हाई. शिवादादांना सांगितलंय. गोविंददादा बरोबर शिरी भैय्यांना भेटून येतो.' अंकुश बाहेर जाताना आंजाला सांगत होता.

 "आवऽऽ मिनिटभर थांबा. दादर चौपाटी समूर वझे सायबांचा बांगला आहे. त्यात तीन म्हातारी माणसं राहतात. त्यात एक नव्वदीची जख्ख आजी आहे. जिचं सगळंच जिथल्या तिथे कारावं लागतं. चोविस तास माणूस पायजे. राहायला खोली त्ये देणार. नि वर पाचशे रूपये. मी छान सेवा करीन म्हातारीची. दादरहून तुम्हाला पण जवळ ऱ्हाईल कामाची जागा. मी काल बोलून आले. आज दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांना फोन करून काय ते सांगावं लागेल. सोनूला पण वळण बरं लागेल. होय? सांगा काय ते…" आंजाने विचारले.


शोध अकराव्या दिशेचा / ४८