पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/11

हे पान प्रमाणित केलेले आहे.

अवचित घडलेला चमत्कार

अशा रडतखडत अवस्थेत साक्षरतेचे वर्ग तुरळक ठिकाणी चालू असता मध्येच एक लहानसा चमत्कार घडला. हा चमत्कार कोणा एका व्यक्तीने जाणूनबुजून योजनापूर्वक केला असे म्हणवत नाही; तसेच तो करण्यामागील हेतु शुद्ध सामाजिक ध्येयवादाचाच होता असेही निश्चितपणे सांगता येत नाही. कोणत्याही हेतूने का असेना, एक गोष्ट अशी घडली की, कोरेगाव तालुक्यातील ल्हासुर्णे या गावच्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी, 'सर्व गाव साक्षर होणार असेल, तर शिक्षकांना या कामासाठी मिळणारी सर्व रक्कम शिक्षक आपणहून गावच्या विकासासाठी देण्यास तयार आहेत,' अशी एक घोषणा एका सभेच्या प्रसंगी करून टाकली. जवळ जवळ १६०० रुपयांचा हा प्रश्न होता. गावकऱ्यांनी हे कार्य मनावर घ्यायचे ठरविले आणि शुक्रवार दि. १० जून १९६० या दिवशी नवलाईदेवीच्या चौकात जी सभा झाली, त्यात सारा गाव साक्षर करून दाखविण्याच्या प्रतिज्ञाही घेण्यात आल्या. नारळ फुटला ; दुसऱ्या दिवसापासून लगेच कामाला सुरुवातही झाली.

आदर्श ल्हासुर्णे गाव

ल्हासुर्ण्याच्या गावकऱ्यांनी कामाची पद्धत मात्र फारच व्यवस्थितपणे बसविली होती. प्रथम गावातील झाडून साऱ्या निरक्षरांची संख्या घेण्यात आली. सुमारे ४०० निरक्षर गावात निघाले. या निरक्षरांसाठी सोयीस्कर ठिकाणी एकूण चौदा वर्ग उघडण्यात आले. स्त्री-पुरुषांचे वर्ग अर्थातच वेगवेगळे होते. वर्ग चालविण्याची जबाबदारी शाळा-शिक्षक व काही सुशिक्षित ग्रामस्थ यांचेवर पडली. प्रत्येक वर्गाचा हजेरीपट ठेवण्यात आला व त्यातील सर्व प्रौढांना हजर ठेवण्यासाठी प्रत्येकी चार-चार ग्रामस्थांची एक, याप्रमाणे चौदा तुकड्या करण्यात आल्या. या तुकड्यांचे सभासद घरोघर जाऊन माणसे वर्गात हजर करीत व वर्ग चालू असेपर्यंत कोणी निघन जाऊ नये, कोणी गावगुंडाने वर्गाला त्रास देऊ नये म्हणून दक्षता ठेवीत असत. या चौदा तुकड्यांवर व एकूण सर्वच वर्गावर लक्ष ठेवण्याचे काम दहा जणांची एक गावसमिती करीत असे. कोणी स्त्री-पुरुष वर्गाला गैरहजर रहात असतील, तर त्यांना भेटून त्यांचे शंकानिरसन करणे, आल्यागेलेल्यांना वर्ग हिंडून दाखविणे व एकूण सर्वसाधारण व्यवस्थेची जबाबदारी घेणे इत्यादी कामे या ग्रामसमितीकडे होती. सारी व्यवस्था गावकऱ्यांनी आपल्याच अक्कलहुशारीने आखली होती, कोणताही पुढारी किंवा सरकारी अधिकारी मार्गदर्शनासाठी त्यांनी आणला नव्हता ही यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट ध्यानात घेण्यासारखी आहे.

। ४ ।