पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/127

हे पान प्रमाणित केलेले आहे.

वरच आडवा झालो. ही गुरे बांधण्याची जागा होती. काटक्यांचा सडा पडलेला होता. पण स्वच्छता पहात बसण्याइतके शरीर आणि मन थंड होतेच कुठे? तास-दोन तास येथून हलूच नये असे वाटत होते. रात्रही येथे काढण्याचा विचार येऊन गेला-चोहोबाजूंंनी घोंघावणाऱ्या पहाडी वादळवाऱ्याची झुंज ऐकत! दोन बुलंद आवाजीच्या गवयांप्रमाणे चालणारी! त्या विराट संगीताचा अंतःस्वर पकडावा, ते निळे अथांग आरपार पहावे! शिवाय आज पौणिमा...पूर्णत्वाला आज सर्व बाजूंनीच उधाण आलेले असणार. पूर्णत्वाकडे सतत झेप पहाणारे हे मानवी मन...

पाण्याच्या शोधासाठी बाहेर गेलेला वाटाड्या परतला. आसपासच्या दोन-चार झोपड्यांतून त्याने डोकावून पाहिले होते. पण कुणी माणूस त्याला दिसला नव्हता. ब-याच वेळानंतर दुरून एक मुलगा येताना त्याने पाहिला. त्याला हाक मारून त्याने पाणी मागितले. मला वाटत होते, आता दोन-चार मिनिटात पाणी येईलच. कारण मुलगा या वस्तीपैकीच होता. पण पोरगं इरसाला निघालं. त्याने माणसं सगळी बाहेर गेलीत, मी कुणाच्या घरात शिरून कसं पाणी आणू, असं वाटाड्याला सांगून अळंटळं चालविली. त्याचा काका शेजारच्याच खोपटात झोपलेला होता. पण तोही उठायला तयार नव्हता मला राग तर मुळीच आला नाही, आश्चर्य मात्र वाटत होते. यापेक्षाही पाण्याची तगमग असलेल्या मुलखातून मी, रणरणत्या उन्हात असाच, अनेकदा प्रवास केलेला आहे. कित्येकदा एकमेकांची भाषाही समजत नव्हती. पण कुठेही मला पिण्यासाठी पाणी मिळाले नाही, असे घडले नव्हते. माणुसकी इतकी आटलेली मी यापूर्वी कधीही अनुभवलेली नव्हती. वाटाड्याला मात्र फारच वाईट वाटत होते. मला तो उठून पुढे चलण्याचा आग्रह करीत होता. मी, पाणी नसले तरी इथेच अर्धा-पाऊण तास विसावण्याच्या मनःस्थितीत होतो. कदाचित थोडी डुलकी लागून गेली असती. पुढील वाटचालीला हुशारी आली असती.

थोड्या वेळाने झोपेतला त्या मुलाचा काका उठला. वाटाड्याचे व त्याचे काहीतरी बोलणे चालू होते. अर्धवट डोळा लागत होता, उठू नये असे वाटत होते; पण वाटाड्याने झोपू दिले नाही. झोपडीसमोरच्या स्वच्छ सावलीच्या जागेवर घोंगडे अंथरले गेले. माझी तेथे अळेबळेच स्थापना झाली. दुसरे कुणी शेजारी मोकळपणे बसूच शकत नव्हते, इतके ते अंथरूण आखूड होते.

काकाचे दोन्ही पाय गेलेले होते. खुरडत खुरडत तो इकडेतिकडे सरकत होता, मुलाला सूचना देत होता, आमच्याशीही बोलत होता. चेहरा मात्र या गिरीमानवाचा फारच तरतरीत वाटला. दाढी असल्याने बरेचदा सिनेमा-नाटकातल्या शिवाजी-संभाजीचाही भास होई. सरळ उभट चेहरा, लहान निमुळती हनुवटी, टोकदार नाक, डोळ्यांतली चमक-बोलताना मधूनच ते बारीक करण्याची लकब, वळणदार भुवया, गळ्यात जाड मण्यांची माळ, कपाळावर गोल टिळा. कानात

। १२० ।