पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/133

हे पान प्रमाणित केलेले आहे.

या सगळ्या गट आणि मनगटबाजीपेक्षा तो गरीब, गरजू आणि हुशार आदिवासीच माझे अधिक लक्ष वेधून घेत होता. त्याला खरी भूक आहे. जमिनीची गरज आहे काही वेळा फॉरेस्ट गार्डशी संधान बांधून, बऱ्याचदा चोरून हा आदिवासी सरकारी जमिनीतला एकर-दोन एकराचा तुकडा लागवडीखाली आणतो. स्वतःला पकडून घेतो, दंड-तुरुंग या शिक्षा लावून घेतो. दंडाच्या पावत्या आठवणीने मागून घेतो, काळजीपूर्वक त्या जपून ठेवतो. दोन-चार वर्षांनी हा मामला उघडकीला येतोच. सरकार एकदम जागे होते. आदिवासींनी बळकाविलेल्या जमिनी काढून घेण्याचे हुकूम सुटतात. तोवर जमिनी कसल्या गेलेल्या असतात. शेतात पिके उभी असतात. सरकारी फौजफाटा पिके उपटायला, तुडवायला शेतात घुसू शकत नाही. कारण वातावरण एकदम तंग बनते. विरोधी पक्ष गहजब माजवतात. सरकारच गुन्हेगार, निर्दय, लोकभावनांची पायमल्ली करणारे ठरते. प्रतिष्ठा सावरण्यासाठी सरकार मग थोडीशी घासाघीस चालू ठेवते. अमुक एक वर्षाच्या अगोदर बळकाविलेल्या जमिनी कायदेशीर ठरवू म्हणते. (इथे त्या दंडाच्या पावत्यांचा, तुरुंगातील शिक्षेचा पुरावा म्हणून उपयोग होतो.) हे वर्ष मग मागेपुढे होत रहाते. शेवट निर्णय मात्र अटळ असतो. नाक मुठीत धरून सरकारला आदिवासींनी लागवडीखाली आणलेल्या जमिनी शेवटी त्यांच्या स्वाधीन कराव्या लागतात. कायदेशीररीत्या. काहीवेळा तर समारंभपूर्वक! केवळ ठाणे जिल्ह्यात सुमारे पन्नास हजार एकर जमिनीवर आदिवासींनी गेल्या दहा-बारा वर्षांत अशा तऱ्हेने कबजा मिळवून दाखविलेला आहे. नवीन चढाया सुरूच आहेत. 'थोडी जमीन गुपचूप बळकवा. ती पदरात पाडून घ्या. पुन्हा बळकवा' हे तंत्र यशस्वी ठरत आहे. आजवर ठरलेले आहे. केवळ नासिक जिल्ह्यात, घुमरे वकील सांगत होते, यंदा दंडाची रक्कम बारा-तेरा लाख रुपये वसूल झालेली आहे.

'माझ्या माहितीप्रमाणे चौतीस लाख रुपये' दुपारी डॉ. फडके यांच्याकडे आम्ही सर्वजण बसलो असता गोदावरी परुळेकर यांनी दुरुस्त आकडा सांगितला.

जमीन कबजा आंदोलनाचे पहिले पर्व समाप्त झाले आहे. मोहिमेचे नेते हिशोबाचे ताळेबंद जमविण्यात गर्क आहेत-अमुक इतकी एकर जमीन 'मुक्त' झाली, प्रश्नाची निकड शासनाला जाणवली वगैरे वगैरे. महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्षाने आंदोंलनाचे पुढचे पाऊल म्हणून निवडक खेड्यात जमिनीचा प्रत्यक्ष ताबा घेण्याची चळवळ सुरू करण्याचा मनोदयही जाहीर केलेला आहे. म्हणजे पहिल्या पर्वात ताबा घेतला गेला नाही, घेण्याची योजनाही नव्हती हे उघडच झाले. मग 'मुक्त' झाली म्हणजे काय ? ही आध्यात्मिक परिभाषा कशासाठी ? अजूनही या आंदोलनाचे पाय जमिनीवर टेकल्यासारखे त्यामुळे वाटत नाहीत. 'नळी फुकिली सोनारे, इक-

। १२६ ।