पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/157

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रीचा वापर अवजारघर-कोठारघर म्हणून. पाच दहा वर्षाच्या परिश्रमानंतर आश्रम उभा राहिला तो एवढाच. पाक्षिक कधी मोठ्या छपाई यंत्रावर चढेलच नाही. संपादक अधूनमधून दिलगिरी व्यक्त करतोच आहे- पावसाळी हवेमुळे शाई वाळली नाही. सबब छपाई थोडी बिघडली आहे. अंकालाही उशीर. क्षमस्व. व्यक्तित्व विकासासाठी केंद्राकडे कुणी फारसे फिरकले नाही. हा एकटाच ताडामाडासारखा तेथे वाढत राहिला. दूरवरून दिसायचा. नजरेत भरायचा. लोक स्तिमित व्हायचे. श्रद्धा, आदर बाळगून असायचे. पण जवळ जाऊन सावलीला उभे रहावेसे कुणाला कधी वाटले नसावे.

आश्रम वाढला नाही; पण दबदबा, दरारा वाढतच गेला. गोविंदपूरच्या आसपासच्या ५-६ गावातील बारीकसारीक घटनांवर शिकारी कुत्र्यासारखा जागता पहारा ठेवण्याची संपादकाची धडपड मात्र यशस्वी होत राहिली. सर्वसामान्य खेडुतावर नोकरशाही अंमल कसा गाजविते, गावातील बडे शेठ-सावकार, जमीनदार नोकरशाहीचा वापर आपल्या स्वार्थसाधनासाठी कसा करून घेतात, लाचलुचपत कुठे चालू आहे, पोलिसी ससेमिऱ्यात कोण विनाकारण गुंतवला जातो आहे, शेतकरी नवे शेतकीतंत्र कसे आत्मसात करतो आहे, या तंत्राचे दुष्परिणाम कोणते, कोर्टात कुठली प्रकरणे का व कशी तुंबून आहेत, गावातील जातीय तेढ वाढण्याची कारणे, हरिजनांना मिळणारी वागणूक, पूर्वीपासून चालू असलेल्या शेजारच्या साखरकारखान्यातील काळेबेरे, धार्मिक उत्सव-गावाला स्पर्श करणारे बहुतेक विषय टिपण्याची संपादकाची पहिल्या अंकापासून धडपड सुरू आहे. यातून नवी प्रकरणे सारखी उद्भवत आहेत, शत्रू वाढत आहे. मित्र म्हणवणारे हळूहळू दूर सरकत आहेत. सौम्य व्हा, जपून लिहा असे प्रेमाचे, आपुलकीचे सल्ले चहात्यांकडूनवाचकांकडून वरचेवर दिले जात आहेत. तरी लेखणी लाठीसारखी चालविण्याचा हट्ट, खुमखुमी, जिद्द कमी न होता वाढतेच आहे. कुठे कुठे ती फिरेल याचा नेम नव्हता.

□ २८-८-१९६८: एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर-ट्युबवेल्स व यांच्या हाताखालील इतर अधिकारी यांची रामपूर व मौजीपूर या गावांना भेट. रामपूरचा नलिका कूप हे अधिकारी आले तेव्हाच सुरू होऊ शकला. तोवर शेतातील भात व उस पाण्याअभावी जळून गेलेला होता. तक्रार अर्जाचे ढीग टेबलावर पडून होते. अधिकाऱ्यांनी एकाही अर्जाकडे लक्ष दिले नाही. शेतकऱ्यांना कुणी भेटलेदेखील नाही. मग हे। महाशय येथे कशासाठी आले असावेत ? भत्ता उकळण्यासाठी.

□ १-९-१९६८ : एका हरिजन स्त्रीची अब्रू लुटण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून खारी गावातील मुस्लिम समाजातील एका व्यक्तीवर खटला भरण्यात आल। होता. पुराव्या अभावी आरोपीची निर्दोष म्हणून सुटका झाली.

। १५० ।