पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/168

हे पान प्रमाणित केलेले आहे.

गांधी जयंती आली. गावात केंद्राने एक मिरवणूक काढली. चाळीस मुले आणि दहा-पाच प्रौढ. मिरवणुकीत घोषणा एकच : म. गांधी की जय ! जोडीला गांधीप्रार्थना-

  ईश्वर अल्ला तेरे नाम । सबको सन्मति दे भगवान् ।
 मंदिर मस्जिद तेरे धाम । सबको सन्मति दे भगवान् ।

पण या भगवानाने सर्वांना सन्मती काही दिली नाही. मुस्लिम मोहल्ल्यात मिरवणूक अडवली गेली. धर्मपिसाट बरळले : गांधी-बिधी येथे नकोत. आमच्या नमाजात व्यत्यय येतो. आमचे कान अपवित्र होतात.

मिरवणूकवालेही हट्टाला पेटले.

पोलिसांनी रस्ता साफ करून मिरवणूक व्यवस्थित पार पाडू दिली.

पुढे पंधरा दिवस मिरवणुकीचा हा कार्यक्रम सर्व मोहल्ल्यातून निर्वेधपणे पार पडतराहिला.

बंदिस्त समाजाच्या भिंतीला केंद्राने यशस्वी धडक मारलेली होती. गावातील हिंदुकडून याचे खूप कौतुक झाले. वास्तविक केंद्राने हिंदू आणि मुस्लिम असा भेद केलेलाच नव्हता. दोन्ही समाजातील धर्मवेडावर सारखाच हल्ला चढविण्याचे सुरुवातीपासूनचेच केंद्राचे धोरण होते.

विणकार धंद्याविषयी माहिती गोळा करण्याचे एक काम केंद्रासमोर होते. यासाठी विणकर समाजातीलच काही तरुण मुले केंद्राने हाताशी धरलेली होती. पण दोन ऑक्टोबरच्या वरील प्रसंगानंतर या मुलांवर पालकांकडून दडपणे येऊ लागली. बहुतेकजण गळाले. माहिती गोळा करण्याचे काम अडून राहिले.

जे अशक्य ते शक्य करून दाखविण्याची आवड व खुमखुमी असलेल्या संपादकाने आपला एक पूर्वीचा मुसलमान विद्यार्थी या कामासाठी मुद्दाम बोलावून घेतला. हरियानातल्या गुरगाव जिल्ह्यातल्या एका मेओ-मुस्लिम सैन्याधिकाऱ्याचा हा मुलगा-सब्दल-खान. पोरगं मोठ चलाख व या कामाची आवड असलेलं होतं. याला आल्याआल्याच 'जासूद' (spy) ठरविले गेले. शुक्रवारच्या प्रार्थनेसाठीसुद्धा याला मशिपात प्रवेश करण्याची बंदी. मुलाने हसतखेळत हे सर्व पचविले. काही दिवसांनी बंदी उठली, मशीद त्याला खुली झाली-संपादकाबरोबर तो आश्रमात रहात होता तरी !


ग्रा...११

। १६१ ।