पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/189

हे पान प्रमाणित केलेले आहे.

दोन


डॉ. विद्याधर पुंडलिक

पुणे विद्यापीठ, समाजशास्त्र प्राध्यापक

ललित लेखक - समीक्षक


 श्री. ग. माजगावकरांच्या पुस्तकांचे नाव असे आहे की, ते उघडण्यापूर्वीच एक क्षण वाचकाने जरा थबकावे- 'श्री ग्रामायन !' माजगावकरांना जे जे व्यक्त करायचे आहे त्याचा 'मर्मबंध' म्हणजे हे नाव. पहिल्या 'श्री' मध्ये श्रद्धा आहे. धार्मिक संस्कृतीच्या हरेक गोष्टीला विरोध म्हणजेच निधर्म असे समजणारा एखादा हट्टी निधर्मीवादी हा 'श्री' बघून आपल्या भिवया जरा उंच करेल ! दुसऱ्या कुणाला त्यातून माजगावकरांमधल्या रोमँटिक स्वप्नाळू वृत्तीचे प्रतिबिंब दिसेल. मला स्वतःला या वृत्तीबरोबरच एक नम्र आणि डोळस श्रद्धाही दिसते. भारतीय जीवनाचा ' मूळारंभ ' खेडेगावात आहे असाही अर्थ त्या शब्दातून डोकावतो. 'ग्रामायन' या दुसऱ्या शब्दात कसले तरी फार मोठे रामायण आपल्या सात लाख ग्रामातून घडवायाचे आहे अशा निर्धाराची सूचनाही आहे.

 हे रामायण भारताच्या सामाजिक अन् आर्थिक नियोजनाचे म्हणजे एक प्रकारच्या पुनर्रचनेचे आहे. 'खेडेगाव हा आपला भारतीय समाजाचा किंबहुना सर्वच पौर्वात्य देशांचा तोलविद् आहे' हे त्या रचनेचे सूत्र असले पाहिजे असे माजगावकरांना म्हणावयाचे आहे. स्वैर, चिंतनात्मक लेख, मुलाखती किंवा मित्रांशी पत्ररूप संवाद-अशा निरनिराळ्या अन् ललित शैलीची प्रसन्न डूब दिलेल्या माध्यमांतून लेखकाने सूत्र गोवत नेले आहे. अशा विविध माध्यमांमुळे काही वेळा माजगावकरांचे लिखाण भरकटत गेले असले तरी त्यांना जी एक बैठक मांडायची आहे तिचा पक्केपणा कुठेही गेलेला नाही.

 हा धागा मनात ठेवून आपण पुस्तक वाचत गेलो की माजगावकरांच्या या एकूण प्रतिपादनामागे चार गोष्टी आहेत हे आपल्याला जाणवते. ग्रामीण जीवनातल्या बदलामागची काही धोरणे आणि संस्था यावरची टीका ही पहिली. काही निश्चित, नैतिक प्रेरणांचा आग्रह ही दुसरी. भारतीय सांस्कृतिक परिवर्तनाचे काही सांस्कृतिक आदर्श ही तिसरी आणि शेवटची भारतीय परिवर्तनासाठी काही विशिष्ट मार्गाची आणि उपायांची आवश्यकता ही चौथी.

। १८२ ।