पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/21

हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्त्रीपुरुषांनी नेटाने शिक्षणाचे काम पूर्ण केले. लहान मुलांना स्वतः सांभाळून पुरुषांनी घरातल्या स्त्रियांना वर्गांना पाठविले, तर रात्री दोन-दोन वाजेपर्यंत वर्गात शिक्षणाचे पाठ घेऊन स्त्रिया पहाटे पुरुषांबरोबर शेतात काम करायला पुन्हा हजर राहिल्या. 'शिक्षणाची ओढ' म्हणून जी म्हणतात ती येथे मूर्तिमंत पहावयास सापडली. काय होते या ओढीचे कारण! गाव सर्व माळी समाजाचा आहे. महात्मा फुल्यांची प्रेरणा येथे जिवंत आहे. गावात कौटुंबिक एकात्मतेची भावना दृढ आहे. ही अनुकूल सामाजिक पार्श्वभूमी लाभली, म्हणून कार्यकर्त्यांच्या व शिक्षकांच्या प्रयत्नांना चटकन यश लाभले व गाव शिक्षणाच्या मोहिमेत पुढे सरकले. जरा चार मैल पलीकडे असणाऱ्या वावधनला चला. दोन नामवंत घराण्यांच्या वैरामुळे गावची हवा कित्येक वर्षे बिघडून गेलेली. येथे ‘सब घोडे बारा टक्के' या न्यायाने समाजशिक्षणाचे कार्य चालू आहे. यश मुळीच नाही. गावात वर्ग सुरूच होऊ शकले नाहीत अशी परिस्थिती. ढोबळ कार्यपद्धतीऐवजी बिथरलेल्या गावची एखादी बारीकशी गरज नेमकी हेरून तेवढी प्रथम भागविणे व हळूहळू लोकमत आपलेसे करून समाजशिक्षणाचा विचार तेथे रुजविणे, हा धीमा मार्ग अशा ठिकाणी कदाचित जास्त उपयोगी पडला असता. मी काय केले असते !‘आज गावात चांगली शाळा आहे. पण विद्यार्थ्यांच्या संख्येच्या मानाने शिक्षक फार कमी आहेत. जे आहेत त्यांपैकी काहींच्या वरचेवर बदल्या केल्या जातात. त्यामळे शिक्षकांकडून शाळेचे काम नीट होत नाही. मुलांचा अभ्यास मागे पडतो'–ही आहे गावकऱ्यांंची मुख्य तक्रार. 'आमच्या मुलांच्या अभ्यासाचा खेळखंडोबा करून आम्हाला सुशिक्षित करण्याचा उलटा धंदा करू नका' असे गावकऱ्यांनी सांगितले तर त्यात त्यांची चूक काय आहे? ही परिस्थिती गावाने शिक्षण अधिकाऱ्यांच्या कानावर अनेकदा घातली. पण उपयोग नाही. शिक्षणखात्याने गावच्या अडचणीविषयी अशा बेफिकिरी दाखविली; गावानेही शिक्षणखात्याच्या समाजशिक्षण मोहिमेचा बोजवारा उडवून लावला. काय साधले यात समाजकल्याण ? शाळेची गरज भागविण्याचा एक टाका मी वेळच्या वेळी घातला असता, तर पुढे ही मोठी हानी सोसण्याचा प्रसंग माझ्यावर आला नसता.

घोडा मागे गाडी पुढे

असा आहे सारा तपशिलाचा विचार. अर्थात जर राजकीय पक्ष किंवा रा. स्व. संघ राष्ट्र सेवा दल, बालवीर संघटना इत्यादी सामाजिक संस्थांनी या कार्यात लक्ष घातले असते, तर या तपशिलाच्या अडचणी स्थानिक पातळीवर जेथल्या तेथेच दूर होऊ शकल्या असत्या; पण नाव घ्यावे असे कोणत्याच प्रकारचे भरीव कार्य या मोहिमेत राजकीय पक्षांनी केलेले नाही. मोहीम जी काही थोडीबहुत यशस्वी झाली ती सरकारी नोकरशाहीच्या प्रयत्नामुळे. मुळात नोकरशाही यंत्रणेच्या काही

। १४ ।