पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/22

हे पान प्रमाणित केलेले आहे.

मर्यादा असतात ही गोष्ट ध्यानात घेता, केलेल्या कामाबद्दल सातारा जिल्ह्यातील नोकरशाही धन्यवादास जरूर पात्र आहे. कारण हा एक नवा आदर्श तिने निर्माण केलेला आहे. परंतु कोणतीही समाजविकासाची चळवळ यशस्वी होण्यास निरनिराळ्या सामाजिक शक्तींची एक विशिष्ट जोड जमून यावी लागते. राजकीय पक्षांनी मतभेद विसरून, कार्याचे पक्षातीत स्वरूप लक्षात घेऊन प्रचाराची पहिली आघाडी प्रभावीपणे उघडावयास हवी. सामाजिक संस्थांनी ध्येयनिष्ठ व तळमळीच्या कार्यकर्त्यांचा योग्य तो पुरवठा करून मधली फळी मजबूतपणे सांभाळायला हवी. या पुरोगामी सामाजिक शक्तींनी पादाक्रांत केलेला मुलुख बंदोबस्तात ठेवण्याचे, झालेल्या कामावर पाणी न फिरवता त्यावर सरकारी सहीशिक्क्याचे मोर्तब चढविण्याचे अखेरचे कार्य नोकरशाही यंत्रणेने पार पाडावयास हवे. नोकरशाही नेहमीच पिछाडी सांभाळते, कारण ती समाजजीवनातील सर्वात जड व स्थिरप्रकृतीची संघटना असते. सातारा जिल्ह्यात सामाजिक शक्तींची ही व्यवस्था उभी राहू शकली नाही, हे आहे गावशिक्षण मोहिमेच्या अल्पयशाचे महत्त्वाचे कारण. येथे आघाडीवरचे राजकीय तोफखाने निवडणुकीच्या लढाईला अद्याप एक वर्ष अवकाश आहे या स्वार्थी विचाराने मैदानात उतरलेच नाहीत. सामाजिक व सांस्कृतिक संघटना या आपल्याकडे अर्धवट राजकीय व अर्धवट सामाजिक-सांस्कृतिक अशा बेगडी स्वभावाच्या असल्याने त्यांचे नेमके कार्यक्षेत्र त्यांना केव्हाच सापडत नाही, त्यामुळे त्या येथेही गैरहजरच; मग जडप्रकृती नोकरशाही हालचाल करून करून किती करणार ! मुळातच गाडीपुढे घोडा लागण्याऐवजी घोडा मागे, गाडी पुढे अशी स्थिती. अशा वेळी जी काय दोन-चार पावले वाटचाल होईल, तेवढ्यावरच संतोष मानून घेण्याखेरीज दुसरे काय करणार ?

महाराष्ट्राचे विकास-सूत्र

भारतीय विकासाची जवळजवळ अशीच तऱ्हा चालू आहे. त्यामुळे दोन पंचवार्षिक योजना उलटून गेल्या, तरी भारतीय जनता अद्याप जागी झालेली नाही. कारखाने, धरणे, इमारती उभ्या रहात आहेत. परंतु येथला 'माणूस' मात्र मान टाकूनच वावरत आहे. महाराष्ट्रात नाही म्हणायला थोडी वेगळी परिस्थिती दिसते. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेमुळे येथे एक वेगळेच चैतन्य जागे झालेले आहे. नवा महाराष्ट्र घडवावा अशी उर्मी येथील लोकमानसात उसळलेली दिसत आहे. सातारा जिल्ह्यातील गावशिक्षण मोहीम हा या ऊर्मीचाच एक लहानसा पुरावा आहे. या ऊमीला नीट आकार देण्याचे कार्य मात्र समाजातील जाणकार मंडळींनी यापुढे 'धर्म' म्हणून स्वीकारले पाहिजे. 'लोकजागृतीतून समाजविकास' हे महाराष्ट्राच्या नव्या विकासाचे मुख्य सूत्र असले पाहिजे. या सूत्राचा अवलंब करून आम्ही पुढे गेलो, तर महाराष्ट्राचीच काय, भारताची भाग्यरेखाही ढळढळीतपणे उमटल्या-

। १५ ।