पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/65

हे पान प्रमाणित केलेले आहे.

काय ? सांस्कृतिक प्रबोधन ही कोणाची जबाबदारी ? आम्ही शहरी सुशिक्षित काय करीत आहोत ? खेड्यात विद्या नाही, शहरात श्रम नाहीत, हा सांधा जुळणार कसा ? जोडणार कोण ? केवळ रहाणीमान वाढण्याचा, वाढविण्याचा हा प्रश्न नाही. ते वाढतेच आहे. खोपटात रेडिओ आहे आणि दुधात पाणी मिसळण्यात संकोचही वाटेनासा झाला आहे. प्रश्न आहे जीवनाचा समग्न स्तरच वर उचलण्याचा. हे कार्य राजसत्ता करू शकते काय ? केवळ उत्पादने साधनांची मालकी बदल की समाजाचा स्तर उंचावतो हा समाजवादी विचार तरी कितपत शास्त्रीय आहे ? मग संपूर्ण राजसत्ता हाती आल्यावर, मालकी हक्कावर आधारित अशी अर्थव्यवस्था नष्ट केल्यावरही माओला चीनमध्ये ‘सांस्कृतिक क्रांती'चे शस्त्र नव्याने पुन्हा का उपसावे लागत आहे ?

खोपट, ट्रान्झिस्टर, लक्तरे, घड्याळ, निवडणुका, शिक्षण......चित्रात कुठलाच सलगपणा जाणवत नव्हता. येथे समृद्धीची आयात दिसत होती; पण ती चिकटवल्या सारखी, उपरी वाटत होती. शिक्षण होते पण त्याचा घरादारावर, वातावरणा प्रभाव नव्हता. रहाणीमानातील वाढ दाखविणारी काही नवीन ठिगळे जुन्या लक्तरांवर लोंबत होती एवढेच. कुठेही आंतरिक सूत्र नव्हते, आतला आणि बाहेरचा मेळ नव्हता. समान पृष्ठभूमी नव्हती. एखाद्या ढासळणाऱ्या ऐतिहासिक बुरुजाला सिमेंट काँक्रीटचा पिलर आधार म्हणून उभा रहावा, पवित्र गाभाऱ्यात विजेची टयूब चकाकावी, ‘सा' नीट जमला नसतानाच कुणी इकडून तिकडून ऐकलेले तानपलटे गळयातून काढीत रहावेत, तसा हा स्वातंत्र्यानंतरचा सारा विकास त्या तीन खोपटांच्या वस्तीत, त्या चांदण्या रात्री मला भेडसावीत होता. विकासाचे हे बेगडी आणि अनुकरणग्रस्त स्वरूप मला अस्वस्थ करीत होते. बेगडीपणा, ही भ्रष्टता आमच्यात कुणी आणली ? याला जबाबदार आम्ही सुशिक्षितच नाही काय ? आमचे समाजातील कार्य काय ? आमच्या अस्तित्वाचा अर्थ कोणता ? चार कथा-कादंबऱ्या-नाटके लिहून लोकांची करमणूक करणे, ज्ञानाच्या नावाखाली शाळाकॉलेजातून, वृत्तपत्रातून, पाठ्यपुस्तकातून माहिती पुरविणे, गाईडे लिहून, क्लास काढून शिक्षणाचे कारखाने चालविणे, एवढेच आमचे इतिकर्तव्य ?वास्तविक अन्वयार्थ सांगण्याची, कार्याकार्य निश्चित करण्याची, समतल वैचारिक पार्श्वभूमी निर्माण करण्याची जबाबदारी समाजातील बुद्धिजीवी वर्गाकडे. पण गेल्या सतरा वर्षांत आमच्यापैकी काही फुटकळ विचारविनिमयावर संतुष्ट राहिले. बहुसंख्येने उदासीनतेचा वा सुखासीनतेचा मार्ग पत्करला. गरज होती मुळापासून हादरण्याची, हलण्याची. एका समग्र आचारविचारदर्शनाची. एक भूदान-ग्रामदान आंदोलनाचा अपवाद सोडला तर स्वातंत्र्यानंतर हे तत्त्वजिज्ञासेचे आणि कर्तव्यात

| ५८ |