पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/66

हे पान प्रमाणित केलेले आहे.

कर्तव्याचे थैमान आमच्यात निर्माणच झाले नाही, ही वस्तुस्थिती आहे. विनोबांच्या व सर्वोदय सांप्रदायिकांच्या अव्यवहारी आणि अशास्त्रीय मांडणीमुळे आम्ही सुशिक्षित त्या आंदोलनापासून दूर राहिलो आणि नेहरूंच्या लोकशाही समाजवादाचे वरवर गोडवे गात रहाण्यापलीकडे आमच्या ध्येयवादाच्या अपेक्षा आणि कक्षा वाढविण्याची आम्हाला कधीच गरज भासली नाही. सरकारी यंत्रणेने सतरा वर्षांच्या समाजवादी वाटचालीत देशातील मलेरियाचे जसे निर्मूलन केले तसे आम्ही सुशिक्षितांनी फार तर एवढे जरूर केले, की शाळा-कॉलेजांचा व वृत्तपत्र-पुस्तकांचा प्रसार वाढवून ज्ञानाच्या गोणी शहरातून खेड्यांपर्यंत वाहून नेल्या. तेथल्या बऱ्याचशा आळशी आणि निरुद्योगी समाजाला तशी फारशी गरज नसताना, करमणुकीची व छानछोकीपणाची चटक लावली. समाज बऱ्याच प्रमाणात साक्षर केला, सज्ञान आणि सुसंस्कृत नाही. परिषदा आणि परिसंवाद भरवून शुष्क काथ्याकूट कला, विद्वत्तेचे प्रदर्शन मांडले, शिफारशींचे आणि अहवालांचे ढीग रचले; पण जिवंत विचार आणि प्रामाणिक आचार लोकांसमोर ठेवला नाही. करमणूक केली, माहिती पुरवली ; विवेकाचे खडे बोल ऐकवले नाहीत. ज्या काळात एखादा रामदासआणि शिवाजी जन्मास यायला हवा त्या काळात थिल्लर तमासगिरांच्या, शुष्क शास्त्रीपंडितांच्या आणि शून्य बाजीरावांच्या पलटणी येथे उभ्या राहिल्या.

होय ! पेशवाईची अखेर आणि आजचा काळ यात खूपच साम्य आहे. उभी मराठी दौलत इंग्रजांच्या घशात जात असता एका शब्दाने कुणी ब्राह्मणपंडिताने समाजाला जाग आणली नाही. कुचाळक्या करण्यात, अनुष्ठानांची आणि होमहवनांची प्रदर्शने मांडण्यात येथले पांडित्य गढून गेले होते आणि येथील कलावंतांची प्रतिभा बावनखणीतील बाजीरावांच्या रंजनात गुरफटून राहिली होती. 'इंग्रज समुद्रातून येतो' यापलीकडे 'भले बुद्धीचे सागर' असलेल्या नाना फडणीसांचे भूगोलाचे ज्ञान जाऊ शकत नव्हते. आणि गोऱ्यांचे राज्य कलियुगात अटळ असल्याची शिकवण खुद्द पेशव्यांना लहानपणापासून दिली जात होती. इंग्रज सत्तेची मर्मस्थाने हुडकून, ती हस्तगत करून, आपल्या समाजाची प्रतिकारशक्ती व संघटित सामर्थ्य यांची नवा मांडणी करण्याची पुसटती जाणीवही त्या काळात निर्माण झालेली दिसत नाही. तोंड फाटेपर्यंत नव्या राज्यकर्त्यांचे स्तुतिपाठ गाणे, त्यांच्या शिस्तप्रियतेचे कोडकौतुक करणे, त्यांच्या शास्त्रीय शोध-बुद्धीमुळे चकित होणे, ही त्या वेळच्या सुशिक्षित शास्त्रीपंडितांची कामे होऊन बसली होती. इंग्रजांनी आणलेल्या कायद्याच्या राज्यामुळे, चार सुधारणांमुळे हा सारा समाजच भारून गेला होता, दिपून गेला हाता, बावरला होता, बावचळला होता. लाचारी, गुलामी, सुखासीनता, लांगूलचालनाची वृत्ती प्रथम या सुशिक्षित वर्गाने धारण केली आणि इतरेजनांनी नंतर तिचे अनुकरण केले.

आज दुसरे काय चालू आहे ? रशिया-अमेरिकेकडे डोळे लावून बसलेला, या परदेशातील ज्ञानविज्ञानांवर व कलासाहित्यावर निर्वाह करणारा, त्या देशात

| ५९ |