पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/75

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ३ रा. ज्ञानेश्वर- श्रीसद्गुरु निवृत्तिनाथ आणि सोपानबाळ महिषाला घेऊन बरेच लांब गेलेले दिसतात ! मुक्ताबाई, निवासक्षेत्र सोडून निघाल्या दिवसापासून आजच्यासारखा प्रवासाचा शीण तुला कधीच झाला नव्हता; त्यामुळे आज तू फार गळून गेलेली दिसतेस ! तर बाळे, आपण येथे घटकाभर बसून विश्रांति घेऊ आणि मग पुढच्या मार्गास लागू ! । मुक्ता०- दादा ज्ञानराया, प्रापंचिकजनांची जेथे उपाधि नाहीं, अशा या प्रशांत मार्गाने, श्रीहरीच्या नामस्मरणाचा पाठ सप्रेम अंतःकरणाने माझ्या मुखांतून एकसारखा निघत असल्यामुळे माझ्या श्रमाचा परिहार क्षणोक्षणी होत आहे ! ज्ञानेश्वर- मुक्ताबाई, इकडे पाहिलेंस का ? प्रवृत्तिमार्गात ज्यांच्यासारखा चतुर पंडित या सर्व जगतांत दुसरा एकही नाहीं, ज्यांनीं सकल विद्यांचे आणि सकल कलांचे ज्ञान संपादन केले आहेज्यांच्या पायांपाशीं सर्व सिद्धि सदैव राबत आहेत, भक्तजनांना जे केवळ कल्पतरुच, असे हे सकलवंद्य, परमसुंदर, अत्यंत तेजः, पुंज, विद्यासागर, योगीश्रेष्ठ चांगदेव समाधिसौख्यांत निमग्न झाले आहेत; आणि त्यांच्याच शेजारी त्यांचा हा शिष्यवर्ग नानाप्रकारची योगासने धारण करून ध्यानस्थ बसला आहे! अहाहा ! मुक्ताबाई, खरोखर आज आपले थोर भाग्य उदयास आल्यामुळे आपल्याला या सिद्धश्रेष्ठांचे दर्शन झालें ! सांप्रत हे श्रेष्ठ समाधि लावून बसले असल्यामुळे जरी त्यांचा आशीर्वादप्रसाद आपल्याला यावेळी मिळण्यासारखा नाहीं, तरी आपण तेथवर जाऊन या समाधिस्थ सिद्धांस प्रणाम करून मग पुढच्या मार्गास लागू ? । ( मुक्ताबाई व श्रीज्ञानेश्वरमहाराज चांगदेवसिद्धांजवळ जाऊन त्यांस नमस्कार करतात. ) मुक्ता०- ज्ञानराजा, मला तर हे सिद्ध साक्षात् कैलासरमण या भूलोकीं उतरले आहेत, असे वाटते ! । ज्ञानेश्वर - मुक्ताबाई, यांच्या योगसिद्धीचे असेच अद्भुत सामर्थ्य आहे !