पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/86

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७६ श्रीज्ञानेश्वरमहाराज चांगदेव- बेटा, हा तुझा विचार आह्मांला फारच पसंत वाटत आहे ! आण तर कागद, दौत, लेखणी. ह्मणने आम्ही एक पत्र लिहित आणि ते तुह्मांपैकी एकाबरोबर त्यांचेकडे पाठवून देऊन, त्यांच्याकडून त्याचे उत्तर मागावतों ! म्हणजे आमच्या पत्रास त्यांच्याकडून जें उत्तर येईल, त्यावरून त्यांची परीक्षा आह्मांला सहज करता येईल ! ( शिष्य कागद, दौत, लेखणी आणून देतो. चांगदेव कागद पुढे घेऊन, हातांत लेखणी धरून विचार करीत कांहीं वेळ स्तब्ध बसल्यानंतर ) शिष्यहो, हा कागद पुढे घेऊन आणि ही लेखणी हातात घेऊन मी बसलो खरा, परंतु त्यांस काय लिहावे, प्रारंभ कसा करावा, हेच मला सुचत नाहींसें झालें आहे ! त्यांना तीर्थस्वरूप लिहावें, तर ते अद्याप लेकरूं आहेत ! त्यांना चिरंजीव ह्मणून लिहूं, तर ते मजपेक्षां ज्ञानवृद्ध असून त्यांची थोर कीर्ति ब्रह्मांडभर पसरलेली आहे ! अग्नि लहान असला तरी इंधनानें तो थोर होतो ! सर्व वसुंधरा आवरून धरणा-या वासुकीला किरडू कोण म्हणेल ? कामधेनु इतर गाईंप्रमाणे कशी होईल ? भगवान् श्रीविष्णला पाठीवर वाहणा-या खगेंद्राला पाखरू ह्मणून कसे चालेल ? मला तर कांहींच सुचत नाहीं ! चौथा शिष्य- गुरुमहाराज, आपण सर्वगुणसंपन्न, सकल कलाविशारद आणि सकल विद्यामंडित असतां, आपण असे चिंताक्रांत कां होतां ? या अखिल भुवनाचे आपण गुरु असून, राजापासून रंकापर्यंत सर्वांस आपण चिरंजीव लिहीत असतां ! त्याप्रमाणेच याही वेळी ‘चिरंजीव विजयी भव ? असाच प्रारंभ करून स्वामींनी पत्र लिहावें ! चांगदेव- बेटा, जे साक्षात् परमेश्वर, त्यांना मी चिरंजीव कसे लिहूं ? दशरथाचा बाळ श्रीरामराजा याने दशाननाला शिक्षा केली ! यशोदेच्या तान्ह्या श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत नखाग्रीं उचलिला ! तसे श्रीज्ञानेश्वर सद्गुरूंचे वय लहान असून त्यांनी आह्मांहूनही अवाटत करणी करून दाखविली आहे ! तेव्हा त्यांना मी लहान कसे लेरयूं ?