पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२००

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बार्डोलीचा नमुनेदार सत्याग्रह बार्डोंलीचा नमुनेदार सत्याग्रह [ गुजराथेंतील बार्डोली तालुक्याची रिव्हिजन सेटलमेंट झाली व तींत नेहमीप्रमाणे ठराविक कारणांचा पाढा वाचून सेटलमेंट ऑफिसरांनी बार्डोली तालुक्याच्या शेतसाऱ्यांत निष्कारण भरमसाट वाढ केली. इतकी वाढ विनाकारण झाली असून ती सारावाढीच्या नियमांना धरून नाहीं, सचच या वाढीची फेर- चौकशी करा आणि तशी फेर-चौकशी करण्याचे आश्वासन मिळेपर्यंत आम्ही शेतसारा भरीत नाहीं, असे बार्डोलीच्या सत्याग्रही शेतकऱ्यांनी जाहीर केलें. या काम सरदार वल्लभभाई पटेल यांनी पुढाकार घेऊन आणि बार्डोली तालुक्यांतील रयतांची अभेद्य संघटना करून नोकरशाहीशी लढा देण्याची तयारी केली. नोकरशाहीनें रयतांत फूट पाडण्याचा, रयतांची मालमत्ता जप्त करण्याचा आणि अखेरीस शेतसारा न भरणाऱ्या रयतांच्या जमिनी जप्त करून त्यांचा लिलांव करण्याचाहि धाक घालून पाहिला. पण कोणत्याहि प्रकारें सत्याग्रहाची लाट मागे हटत नाहीं, असें पाहिल्यावर सरकारनें तडजोडीची भाषा सुरू केली आणि अखेरीस सारावाढीची फेरचौकशी करण्याचे आश्वासन मिळून मध्यस्था- मार्फत हा तंटा मिटविण्यांत आला. हा सत्याग्रह यशस्वी होण्यास कोणकोणत्या गोष्टी कारणीभूत झाल्या हें या लेखांत नमूद केले गेले असून, त्यावरून कोण- ताहि सत्याग्रह सुरू करण्यापूर्वी सत्याग्रही पक्षाची बाजू की बळकट असावी लागते हें पारखण्याची कसोटीच या लेखांत ठरविली गेली आहे व त्या दृष्टीनेंच या सत्याग्रहाला 'नमुनेदार' सत्याग्रह म्हटले आहे. ] शिष्टाईचें लोण कडेला पोचलें दुराग्रही सरकार आणि बार्डोलीचे सत्याग्रही पुढारी यांच्या दरम्यान मध्यस्थी करणाऱ्या समेटाग्रही पक्षाच्या प्रयत्नास अखेरीस यश येऊन बार्डोलीच्या तडजोडीच्या अटी उभयपक्षी मान्य झाल्या, सत्याग्रह बंद केल्याचें जाहीर झालें आणि बंदिवासांत पडलेले सत्याग्रही वीर मुक्त होऊन आपल्या आश्रमांत परत आले हे ऐकून कोणाहि स्वराज्याभिमानी मनुष्यास हर्ष वाटल्यावांचून राहणार नाहीं. तीन आठवड्यांपूर्वी जेव्हां मुंबईच्या गव्हर्नरांनी कायदेमंडळापुढे रावणशाही थाटाचें भाषण केले तेव्हां ती दडपशाहीची प्रस्तावनाच आहे असे सर्वोस वाटले. (केसरी, दि. १४ ऑगस्ट १९२८ )