पान:संजीवनी (अँटिरेट्रोव्हायरल थेरपी )(Marathi).pdf/७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

घेण्यासाठी अचानक त्यांच्या ताटात हात घातला नि भात घेतला. बेसावध असल्यामुळे क्षणभर त्या गांगरून गेल्या, पण लगेचच त्यांनी बारक्याच्या थोबाडात दिली. त्याच्या हाताचा घास पडला. "किती वेळा सांगितलं माझ्या ताटात हात घालायचा नाही." बारक्या कळवळला. एकदम डोळ्यात पाणी आलं. हमसून हमसून रडू लागला. मंगलताई तशाच उठल्या. तणतणत आतल्या खोलीत गेल्या. भिंतीला टेकून उभ्या राहिल्या. चार-सहा उसासे टाकले. बाहेर बारक्याचं मुळूमुळू रडणं चाललं होतं. तांब्यात पाणी घेऊन हात धुतला, तोंड धुतलं. तोंडावर पाणी मारलं. जरा मन शांत झालं. बाहेर आल्या व बारक्याला मांडीवर घेतलं. त्यानी थोडा प्रतिकार केला आणि एकदम ताईंना कवटाळलं. त्या त्याला घट्ट धरून रडू लागल्या. मग जरा शांत होऊन बारक्याला त्याच्या ताटातलं जेवण भरवलं.

 गादी अंथरली. त्याला शेजारी घेऊन लवंडल्या, त्याला थोपटत राहिल्या. मनात नाना प्रकारचे विचार येत होते. त्या काउन्सिलरनी सांगितलेली एक एक गोष्ट आठवण्याचा प्रयत्न करत होत्या. एचआयव्ही डास चावल्यानी पसरत नाही. एकमेकांचे कपडे वापरल्याने पसरत नाही. त्यांनी वापरलेला संडास, मोरी वापरल्याने पसरत नाही. घामातून पसरत नाही. हस्तांदोलन केल्याने, मिठी मारल्याने पसरत नाही. पण कोणी आपल्या ताटात खाल्लं तर? आपल्याशी खेळताना आपल्याला त्यानं बोचकारलं तर त्याला हा आजार होईल का?

  काउन्सिलरनी सगळं समजावून सांगूनही हे प्रश्न परत परत ताईंचं डोकं पोखरत होते. तरी नशीब त्याला काही झालेलं नाही. काउन्सिलरने हॉस्पिटलात त्याचीही चाचणी करून घ्यायला सांगितलं होतं. पोराच्या जन्माअगोदर लागण झाली असेल तर कदाचित पोरालाही झाली असेल असं म्हणाला. ताईंच्या तोंडचं पाणी पळालं होतं. पोराचा चाचणीचा काय निकाल येईल या धास्तीने रात्रभर झोप लागली नव्हती. मनातल्या मनात सोमजाईला नवस बोलला- 'बाई पोरगं ठीक असू देत. साडी 53 . .