पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. ११९ अंगीकार करण्यांत आला आहे.) पण हिंदुस्थानाच्या नकाशाकडे पाह- णारास हा वाद चुकीचा वाटतो. या दोन्हीही नद्या एकाच हिमालयाला भेदून हिंदुस्थानच्या सपाट प्रदेशावर वाहात येतात; त्या दोन्ही नद्या आपआपल्या बाजूच्या हजारों मैलांच्या प्रदेशास आपल्या प्रवाहानें आपल्या पुरानें व पुरा बरोबर उत्तम वनस्पतींच्या खताच्या गाळानें सुपीकता आणतात व बऱ्याच प्रदेशापर्यंत जवळ जवळ समांतर वाहात जाऊन मग प्रयागास एकमेकींशीं संगत होऊन एकजीव चनून एकरूपानें आपला पुढला मार्ग आक्रमण करतात. त्याप्रमाणे शिवाजी व रामदास या दोन विभूति एकाच उदयोन्मुख महाराष्ट्रांत समकाळी जन्म घेतात व आपआपल्या परीनें- एक प्रत्यक्ष राज्यस्थापनेच्या उद्योगास सुरवात करून व तो यशस्वी करून, दुसरी आध्यात्मिक व व्यावहारिक उपदेशानें जनमनाची सुधारणा करून- राष्ट्रकार्य बऱ्याच काळपर्यंत एकमेकांस न कळतां व स्वतंत्रपणे करीत राहतात व आयुष्याच्या शेवटल्या भागांत गुरुशिष्य या नात्याने त्यांचा संगम होतो. तेव्हां अशा दोन विभूतींसंबंधीं तारतम्यानें मोठेपणाचा वाद करणें हें संकुचित बुद्धीचें लक्षण आहे. तरी असल्या शुष्क वादांत न पडतां महाराष्ट्रांत समकालीन उदयास आलेल्या या दोन विख्यात विभूतींच्या चरित्रापासून हल्लींच्या परिस्थितीला अनुरूप अशा तऱ्हेची देशसेवा करण्याची स्फूर्ति महाराष्ट्रीयांस होवो अशी आशा प्रदर्शित करून वाचकांची रजा घेतों. समाप्त.