पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/७९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. रामदासाच्या मनांत हाच आध्यात्मिक विषय सारखा घोळत होता असे म्हटल्यावांचून गत्यंतर नाहीं. ७४ आध्यात्मिक विषय म्हणजे संस्कृतांतील वेदातांचें मराठी भाषेत निरू- पण होय. जें धार्मिक जागृतीचें काम ज्ञानेश्वरापासून महाराष्ट्र साधु केलें व ज्यामुळे मराठी भाषेंत सामान्य जनांस समजे असें आध्यात्मिक वाङ्मय तयार झालें तेंच काम रामदासांनीं आपल्या दासबोधानें पुढे चालविले यांत शंका नाहीं. रामदासांनी या वेदांताचें एक तत्वपंचकच आपल्या दासबोधांत बनविलें असे म्हटले तरी चालेल. जग हें मिथ्या आहे. त्यांत सत्य किंवा सार मुळींच नाहीं; हैं जग म्हणजे मायेनें उत्पन्न केलेला आभास आहे; अर्थात् जगांतील कोणत्याही गोष्टीच्या पाठीस लागणें; त्याची इच्छा करणें; ती मिळविण्याचा प्रयत्न करणें या गोष्टी मृगजळाच्या शोधार्थ धावण्यासारखा वृथा आहेत हें रामदासी वेदांताचें पहिलें तत्व होय. मानवी आयुष्य जन्मल्यापासून मरेपर्यंत क्लेशमय आहे; हा संसार दुःखमय आहे; मनुष्याला तापत्रयापासून नेहमीं पीडा होते; हें रामदासी वेदांताचें दुसरें तत्व होय. या जगांत एकच शाश्वत नित्य सत्य अविनाशी व अनंत अशी जिनस आहे व ती परब्रह्म किंवा परमात्मा होय. या परब्रह्माच्या मायेच्या योगानेंच सृष्टि उदयास येते व विलयास जाते. अर्थात् ही सर्व सृष्टी विनाशी व अनित्य आहे; परब्रह्म मात्र अक्षय व टिकाऊ आहे व म्हणून तेंच खरें साध्य आहे; हें रामदासी वेदांताचें तिसरें तत्व होय. मनुष्याचा आत्मा हा परमात्म्याचा एक अंश आहे. देहामुळे प्रत्येक जीवात्मा निराळा भासतो, पण सर्व भूतांचेठायीं अन्तरात्मा एक आहे व तो परमात्माच होय. जीवात्मे निरनिराळे वास्तवीकपणें नाहींत; परमात्मा व जीवात्मा हे एकच आहेत; हें रामदासी वेदांताचें चवथें तत्व होय. परमात्म्याची प्राप्ती करून घेणें, आपल्याला मोक्ष मिळविणे म्हणजे परमात्म्याचें व जीवात्म्याचें ऐक्य किंवा अद्वैत जाणणें होय. ज्याच्या हें ऐक्य अनुभवास आलें त्याला मुक्ति मिळालीच; हें ऐक्यभावाचें ज्ञान